मुंबई : भाजपने राज्यसभा निवडणुकीत राज्यातील तीनही जागा जिंकून महाविकास आघाडीला जबरदस्त दणका दिला आहे. आमचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची अचूक रणनीती यशस्वी ठरली. त्यांनी ‘परफेक्ट प्लॅन’ करून सहावी जागा निवडून आणली. आता विधान परिषदेतही आम्ही सर्व सहा जागा जिंकणारच, असा आत्मविश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
राज्यसभा निवडणुकीचा निकाल आज (११ जून) पहाटे चारच्या सुमारास जाहीर झाला. यामध्ये महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाचे प्रत्येकी तीन उमेदवार निवडून आले आहेत. भाजपचे धनंजय महाडिक हे शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव करून सहाव्या जागेवर निवडून आले आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या या निकालानंतर आता राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे.
आज माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात राज्यसभा निवडणुकीत भाजप तिसरी जागा जिंकणारच होती. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आम्ही त्यांच्याकडे (महाविकास आघाडी) आग्रह धरला की, हा हट्ट करू नका. गेल्या २४ वर्षांत महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुका झाल्या नाहीत. आमच्याकडे भाजपची ३० मते आहेत, त्यामुळे तुम्ही कशासाठी हट्ट धरता? विधान परिषद निवडणुकीत पाचवी जागा जिंकता येते तरीसुद्धा बिनविरोध होऊ, असेही आम्ही सांगितले होते; पण त्यांनी ऐकले नाही.
संजय राऊत हे सहाव्या क्रमांकावर गेल्याचा आनंद
देवेंद्र फडणवीस हे असे रसायन आहे की, त्यांच्या डोक्यात काय चालले हे माझ्यासारख्या सहकारी कार्यकर्त्यालादेखील कळणे अवघड आहे. आमचा त्यांच्यावर खूप विश्वास आहे. ते जे सांगतील तेवढेच काम आम्ही करतो. संजय राऊतांपेक्षा आमच्या उमेदवाराला किमान अर्धा मत अधिक मिळेल, हे देंवेद्र फडणवीस यांनी लक्ष्य ठेवले होते. त्याप्रमाणे नियोजन करत त्यांनी सहावा उमेदवार विजयी केला. त्यानुसार धनंजय महाडिकांना संजय राऊतांपेक्षा अर्धा मत (४१.५६ मते) अधिक मिळाले आहे. देवेंद्रजी यांनी ‘परफेक्ट प्लॅन’ करून सहावी जागा आणली. महाडिकांना ४१.५६ मते मिळाली, राऊतांना सहाव्यांना क्रमांकावर जावे लागले, त्यांना ४१ मते मिळाली. देवेंद्रजींनी हे ठरवलं होते की, महाविकास आघाडीच्या उमेदवारापेक्षा आपल्या उमेदवाराला अर्धा मत जास्तच मिळायला पाहिजे आणि तसेच झाले. संजय राऊत हे सहाव्या क्रमांकावर गेल्याचा आनंद मला आणि देवेंद्र फडणवीसांना झाला आहे.
त्यांना फटके खाल्ल्याशिवाय शहाणपण येत नसेल तर….
महाराष्ट्रातील आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्यसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यामुळे महाविकास आघाडी काही शहाणपण शिकेल का? असा प्रश्न विचारला असता, चंद्रकांत पाटील म्हणाले, त्यांना फटके खाल्ल्याशिवाय शहाणपण शिकता येत नसेल तर त्यांना तसेही फटके मिळतील. विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही सहा जागा विजयी करणार. तुम्ही म्हणाल, हा काय अतिआत्मविश्वास आहे; पण हा आत्मविश्वास आहे, हे एक गणित आहे. जिथे मते दाखवून टाकावी लागतात, तिथे आम्हाला जर अकरा मते जास्त मिळत असतील, तर विधान परिषद निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान केले जाते. त्यामुळे तेथे आम्ही सहा जागा नक्की जिंकणार.
निवडणूक आयोगावर आक्षेप घेणे चुकीचे
विरोधकांवर टीका करताना पाटील म्हणाले, तुमचा या देशामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेवर विश्वास नाही. राज्यघटनेवर विश्वास नसल्यामुळेच तुम्ही विधानसभा अध्यक्ष निवडीचा गुप्त मतदान पद्धतीचा कायदा बदलला. म्हणून रडीच्या डावाचा काही विषय नाही. भाजपचेही दोन आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळलेच ना. त्यामुळे निवडणूक आयोगावर आक्षेप घेणे चुकीचे आहे.
सत्तेचा दुरुपयोग तर हेच करत आहेत
केंद्रीय यंत्रणांचा भाजपने दुरुपयोग केल्याच्या शिवसेनेच्या आरोपावर पाटील म्हणाले, नाचता येईना अंगण वाकडे, असेच यावर म्हणावे लागेल. मला कोणाचे समर्थन करायचे नाही; पण महाराष्ट्रात तुमची सत्ता असताना एका अभिनेत्रीला (केतकी चितळे) या पोलिस ठाण्यातून त्या पोलिस ठाण्यात फिरवले जातेय, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ‘केवळ एक थोबाडीत लगावली असती’ असे विधान केल्यावरून त्यांना तुरुंगात टाकले होते, तर मग काल संजय राऊत यांनी हात तोडून टाकेन, अशी भाषा वापरली, मग लावा आता त्यांच्यावर केसेस. सत्तेचा दुरुपयोग तर हेच करत आहेत. सामान्य कार्यकर्त्याला हरवण्यासाठी भाजपने पैशांचा अक्षरश: पाऊस पाडला, या संजय राऊतांच्या आरोपावर ते म्हणाले, आम्ही संजय पवारांना हरवले नाही. ते माझ्या घरातील आहेत. वाटल्यास विचारा पवारांना; पण मला शेवटी माझा पक्ष मोठा आहे. आम्ही मतं फोडली नाहीत, ती आम्ही मिळवली. सत्ताधाऱ्यांनीच निधीची धमकी, आमिष दाखवून घोडेबाजार भरवण्याचा प्रयत्न केला, असा पलटवार पाटील यांनी केला.
सुडाचे राजकारण चुकीचे
संजय राऊतांनी ज्यांची मते फुटली त्यांची नावे आमच्याकडे असल्याचे म्हटले होते. त्यावर पाटील म्हणाले, इथेच तर त्यांची कार्यपद्धती चुकते. हे सुडाचे राजकारण गेली अडीच वर्षे सुरू आहे. या सरकारला सत्तेत राहून वाटतेय की, याला उचलू, त्याला उचलू, मी तीन पानी नोट देऊ शकतो की, या सरकारने फडणवीस सरकारची कोणकोणती लोकोपयोगी कामे रद्द केली. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन अडीच वर्षे झाली; पण एकही केस ते जिंकू शकले नाहीत. आता करेक्ट कार्यक्रम २० तारखेला असल्याचेही ते म्हणाले.
'माणसं आपलीशी करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं आणि त्यांनी चमत्कार घडवला' ही @PawarSpeaks यांची प्रतिक्रिया बोलकी आहे… आमचे @Dev_Fadnavisजी आहेतच तसे! प्रतिस्पर्ध्यांच्या यशाचं मनमोकळं कौतुक करणं आणि आणखीही बरंच काही पवारसाहेबांकडून खरोखरच शिकण्यासारखं आहे. @BJP4Maharashtra
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 11, 2022
शरद पवारांकडून खरोखरच शिकण्यासारखे आहे
भाजपच्या राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. त्यांच्या कौतुकाला उत्तर देतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट केले आहे. चंद्रकांत पाटील ट्विटमध्ये म्हणतात,” ‘माणसं आपलीशी करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं आणि त्यांनी चमत्कार घडवला’ ही शरद पवार यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. आमचे देवेंद्र फडणवीसजी आहेतच तसे! प्रतिस्पर्ध्यांच्या यशाचं मनमोकळं कौतुक करणं आणि आणखीही बरंच काही पवारसाहेबांकडून खरोखरच शिकण्यासारखं आहे”.