मुंबईः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर जोरदर टीका केली. दिशा सालियन आणि सुशांत सिंह यांची आत्महत्या नाही तर हत्या करण्यात आली असल्याचे खळबळजनक वक्तव्य राणे यांनी केले. तसेच माझ्या जुहूच्या घरात एक इंचाचंही बेकायदा बांधकाम केले नाही, मातोश्रीच्या सांगण्यावरूनच ही तक्रार करण्यात आली. तसे तक्रारदारानेही स्पष्ट केले आहे. पण असो. ते आम्हाला चांगल्या आठवणी देत आहेत. सूडाने कारवाई होत आहे. या सर्वांना उत्तर देण्यासाठी मी समर्थ आहे, असा सूचक इशारा राणे यांनी दिला.
दिशा सालियनची आत्महत्या नाही तर बलात्कार-राणे
दिशा सालियनची आत्महत्या नाही तर बलात्कार करुन हत्या करण्यात आली. सुशांत सिंह हा दिशा सालियनच्या हत्येचा पर्दाफाश करणार होता, म्हणून त्याची हत्या करण्यात आली असल्याचे खळबळजनक वक्तव्य राणे यांनी केले. दिशा सालियनचा ८ जूनला बलात्कार करुन हत्या करण्यात आली. सांगितले आत्महत्या केली. मात्र, तिने आत्महत्या केली नव्हती, तर तिची हत्या करण्यात आली असल्याचे राणे म्हणाले. यावेळी तिथे कोणत्या मंत्र्यांची गाडी होती ? असा सवालही यावेळी राणेंनी उपस्थित केला. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी राज्य सरकारसह शिवसेनेवर जोरदर टीका केली.
सुशांत सिहच्या प्रकरणात काहीतरी लपवा लपवी चालली आहे- राणे
सुशांतच्या घरातील सावंत नावाचा मुलगा कुठे गेला? तो अद्याप बेपत्ता आहे. तसेच रॉय म्हणायचा मुलगा होता, तो कुठे गेला, तोही अद्याप गायब असल्याचे राणे यावेळी म्हणाले. तसेच दिशा सालियनच्या घरातील वॉचमन कुठे आहे? तो देखील गायब असल्याचे राणे यावेळी म्हणाले. कोण काहीतरी लपवते, हेच यावरुन स्पष्ट होत असल्याचे राणेंनी यावेळी सांगितले. लपवलेल्या गोष्टी बाहेर याव्यात असेही राणे यावेळी म्हणाले.
जुहूच्या घरात एक इंचाचंही बेकायदा बांधकाम नाही, मातोश्रीच्या इशाऱ्यावरूनच तक्रार राणेंचा आरोप
जुहू येथील माझ्या घरात मी एका इंचाचंही बेकायदा बांधकाम केलं नाही. मला बेकायदा बांधकाम करण्याची गरज पडली नाही. माझी इमारत शंभर टक्के कायदेशीर आहे. या इमारतीला सीसी आणि ओसी मिळालेली आहे. एकही गोष्ट मी अपूर्ण ठेवली नाही. मातोश्रीच्या सांगण्यावरूनच ही तक्रार करण्यात आली. तसे तक्रारदारानेही स्पष्ट केले आहे. पण असो. ते आम्हाला चांगल्या आठवणी देत आहेत. सूडाने कारवाई होत आहे. या सर्वांना उत्तर देण्यासाठी मी समर्थ आहे, असा सूचक इशारा राणे यांनी दिला.
माझ्या जुहूच्या घरात १७ सप्टेंबर २००९ आलो. १४ वर्ष झाली मी या घरात आलो. या इमारतीचे आर्किटेक्ट नामांकित आर्किटेक्टने आहेत. त्यांनी ही इमारत बांधली आहे. ही इमारत बांधल्यानंतर १९९१ डीसी रुलप्रमाणे इमारत बांधली आणि पजेशन देण्यात आले. ओसी आणि सीसी दोन्ही गोष्टी पालिकेने दिल्या होत्या. मी एकही गोष्ट अपूर्ण ठेवली नाही. त्यानंतर एक इंचही बांधकाम केले नाही. काही आवश्यकताच पडली नाही. माझे दोन मुले. त्यांच्या पत्नी आणि दोन लहान मुले असे सहा जण आम्ही या घरात राहतो. त्यामुळे या ठिकाणी हॉटेल किंवा कोणताही व्यवसाय चालत नाही. ही निवासी इमारत आहे. शंभर टक्के कायदेशीर इमारत असतानाही सेनेकडून, मातोश्रीकडून काही लोकांना सांगून या इमारतीविरोधात तक्रार करण्यात आली आहे, असे नारायण राणे म्हणाले.
मुख्यमंत्री यांच्या जागेवर दुसरा कोणी असता तर पदावर बसला नसता-राणे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाबद्दल बोलताना राणे म्हणाले की, दुसरा कोणी असता तर पदावर बसला नसता, राजीनामा दिला असता , आता उभा रहायला दोन दोन वर्षे लागतात, महाराष्ट्रात अशी वेळ कुणावर आली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा धंदाच केला. शिवरायांचं नाव घ्यायचं असेल तर जनतेला अन्न वस्त्र निवारा देण्यासाठी कायतरी करा. मंत्रालयात जात नाहीत, कॅबिनेट बैठकीला, सभागृहात जात नाही मुख्यमंत्री, असाही मुख्यमंत्री झाला याची इतिहासात नोंद होईल. गुणवत्ता पात्रता नसतानाही सव्वादोन वर्षे काढली ही बाळासाहेबांची पुण्याई…साहेब असे नव्हते, असे नारायण राणे म्हणाले.