युतीच्या चर्चेत पडू नका, मनसेचा स्वबळाचा नारा

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. आज मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीत मनसे स्वबळावर लढणार असल्याचे आदेश दिले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले कि, युतीच्या चर्चेत पडू नका. तुम्ही निवडणुकीच्या कामाला लागा. तुमच्या मनात विषय येत असेल युतीच काय होणार?, युती होईल की नाही ते पुढे बघू तुमची स्वतंत्र लढण्याची तयारी असली पाहिजे.  शिवाय कार्यकर्त्यांनी युतीच्या चर्चेत पडू नये अशा सूचनाही राज ठाकरे यांनी दिल्या आहेत.

बैठक संपल्यानंतर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, निवडणुकांचं नियोजन कसं करायचं, सोशल मीडियाचं नियोजन कसं करायचं, उमेदवारांची निवड कशी करायची, या विषयी चर्चा झाली आहे. राज ठाकरे यांनी आम्हाला स्वतंत्रपणे लढण्याचे आदेश दिले आहेत. झोपलेली महाविकास आघाडी हा आमच्या समोरील मुद्दा आहे. शिवसेनेनं प्रभाग रचना बदलली तरी नाराजी बदलू शकत नाही. शिवसेनेला अनुकूल असं काही नसतं. मराठी माणसं, हिंदू माणसं सेनेबरोबर आहेत का? लोकांची मानसिकता शिवसेनेसोबत नाही. कोरोना काळात लोकांना त्रास झालेला आहे. आजचं मरण उद्यावर टाकण्याचा प्रयत्न असल्याचं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले आहेत. मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न कुणीही केला तरी गेल्या दीडशे वर्षातही ते कुणाला जमणार नाही, असं संदीप देशपांडे म्हणाले.

Share