२ क्वार्टर दारू पिऊनही नशा चढेना! उज्जैनच्या मद्यपीची थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार

भोपाळ : दोन क्वार्टर दारू पिऊनही नशा झाली नसल्याची अजब तक्रार मध्य प्रदेशातील उज्जैनमधील एका व्यक्तीने थेट राज्याच्या गृहमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. दारूमध्ये पाणी मिसळून ती विकत असल्याचा आरोपही या मद्यप्रेमीने केला आहे. विशेष म्हणजे या दारुड्या व्यक्तीच्या तक्रारीची दखल घेतली गेली असून, पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दारू पिऊन नशा न झाल्याची गृहमंत्र्यांकडे तक्रार करणाऱ्या या व्यक्तीची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

मध्य प्रदेशातील उज्जैन येथील बहादूर गंजमध्ये राहणाऱ्या लोकेंद्र सोठिया या ४२ वर्षीय व्यक्तीला दारू पिण्याचे व्यसन आहे. १२ एप्रिल रोजी सोठिया यांनी क्षीर सागर परिसरात असलेल्या एका दारूच्या दुकानातून देशी दारूच्या चार सीलबंद बाटल्या (चार क्वार्टर) खरेदी केल्या होत्या. मित्रासोबत मी त्यापैकी दोन बाटल्या (प्रत्येकी १८० मिली) प्यायलो; पण मला नशा वाटली नाही. त्यामुळे त्या दारूमध्ये भेसळ असल्याचे मला जाणवले. त्या दारूच्या बाटल्यांमध्ये अल्कोहोलमिश्रित पाणी असल्याचा दावा सोठिया यांनी केला आहे. सोठिया यांनी दारू दुकानदाराकडे तक्रार केली;पण दुकानदाराने त्यांचे काहीही ऐकून न घेता धमकी देऊन हुसकावून लावले.

दोन क्वार्टर दारू पिऊनही नशा न झाल्यामुळे सोठिया यांनी उत्पादन शुल्क विभागासह
उज्जैनचे पोलिस अधीक्षक सत्येंद्र कुमार शुक्ला तसेच राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना पत्र लिहून याबाबत तक्रार केली आहे. दारू बनावट आणि त्यामध्ये भेसळ असल्याचा संशय सोठिया यांनी व्यक्त केला आहे. त्या दुकानातून भेसळयुक्त दारू विकली जात होती, असा आरोपही त्यांनी केला आहे. त्यांच्या या तक्रारीनंतर येथील उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यास सांगितले आहे.

लोकेंद्र सोठिया म्हणाले, ‘मी अजून दोन बाटल्यांचे सील उघडलेले नाही आणि गरज पडल्यास त्या बाटल्या मी पुरावे म्हणून सादर करेन. खाद्यपदार्थ, तेल आणि इतर गोष्टींमध्ये भेसळ होत असल्याच्या बातम्या येत आहेत, मात्र आता दारूमध्येही भेसळ होत आहे. हे योग्य नाही. मी ग्राहक मंचात जाईन. गेल्या दोन दशकांपासून आपण दारूचे सेवन करत असून, त्याची चव आणि दर्जा आपल्याला चांगलाच माहीत आहे,’ असे सोठिया यांनी म्हटले आहे.

सोठिया यांचे वकील नरेंद्र सिंह धाकडे म्हणाले, लोकेश सोठियासोबत झालेल्या फसवणुकीचे प्रकरण आम्ही ग्राहक मंचाकडे नेत आहोत. ‘माझ्या क्लायंटचा ‘पेड पार्किंग’चा व्यवसाय आहे. तो अनेक वर्षांपासून दारू पितो, त्यामुळे त्याला भेसळयुक्त आणि अस्सल दारूची ओळख आहे.’

Share