चंदीगड : पंजाबी गायक आणि कॉँग्रेस नेता शुभदीप सिंग सिद्धू ऊर्फ सिद्धू मुसेवाला यांची
रविवारी गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. दरम्यान, सिद्धू मुसेवाला यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी चार दिवस अगोदर सोशल मीडियावर टाकलेली शेवटची पोस्ट व्हायरल होत आहे. एका गाण्याचा व्हिडीओ शेअर करून ”मला चुकीचे समजू नका…” असे कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिले आहे.
पंजाब सरकारने सिद्धू मुसेवाला यांची सुरक्षा व्यवस्था हटवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रविवारी (२९ मे) मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावाजवळ अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार करत त्यांची हत्या केली. या घटनेनंतर पंजाबसह संपूर्ण भारतात खळबळ उडाली आहे. मृत्यू होण्याच्या चार दिवसांपूर्वी सिद्धू मुसेवाला यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट त्यांची शेवटची ठरली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
सिद्धू मुसेवाला हे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असायचे. ते नेहमी त्यांच्या गाण्याचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असत. सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. सिद्धू यांच्या मृत्यूच्या चार दिवसांपूर्वी त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली होती. यात त्यांनी त्यांच्या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले होते.
https://www.instagram.com/tv/Cd-4DIpJZYK/?utm_source=ig_web_copy_link
हे गाणे शेअर करताना सिद्धू मुसेवाला यांनी पंजाबीमध्ये कॅप्शन दिले होते. “याला विसरून जा; पण मला चुकीचे समजू नका”, असे कॅप्शन त्यांनी दिले होते. सिद्धू मुसेवाला यांचे नवीन गाणे चार दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले होते. ‘लेवल्स’ असे या गाण्याचे नाव आहे. या गाण्याला अवघ्या ६ दिवसांत ६० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक यूट्यूबर्स युजर्सना हे गाणे खूप आवडले आहे. या गाण्याचाच व्हिडीओ त्यांनी आपल्या चाहत्यांसाठी शेअर केला होता.
गायक सिद्धू मुसेवाला यांनी आपल्या करिअरची सुरुवात गीतकार म्हणून केली होती. ‘लायसन्स’ या गाण्याचे बोल त्याने लिहिले होते. सिद्धू मुसेवाला अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता तेव्हा त्याला संगीताची आवड निर्माण झाली. मुसेवालाने त्याच्या महाविद्यालयीन जीवनापासून संगीत शिकण्यास सुरुवात केली. ‘सो हाय’ गाण्यामुळे ते अधिक चर्चेत आले. २०१८ मध्ये त्यांनी त्यांचा पहिला अल्बम PBX 1 रिलीज केला होता.
आता मलाही गोळ्या मारा, सर्व काही उद्ध्वस्त झालंय’,; मुसेवाला यांच्या आईचा आक्रोश
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची सुरक्षा व्यवस्था राज्य सरकारने काढून घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांची हत्या करण्यात आली. यावरून विरोधकांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सरकारवर हल्लाबोल केला आहे. व्हीआयपी सुरक्षा हटवल्यानंतर लोकांची यादी ज्या पद्धतीने सार्वजनिक झाली, त्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, सिद्धू मुसेवाला यांच्या आईनेही पंजाब सरकारला घेरले आहे. मुसेवाला यांची आई चरणजीत कौर यांनी आपल्या मुलाच्या हत्येला भगवंत मान आणि अरविंद केजरीवाल जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यांनाही गोळ्या घातल्या पाहिजेत, असे चरणजीत म्हणाल्या.
अकार्यक्षम सरकार, सर्व काही उद्ध्वस्त झालं
चरणजीत कौर रुग्णालयात रडत म्हणाल्या, ‘असे निरुपयोगी सरकार आले आहे, ज्याने सर्व काही उद्ध्वस्त केले. माझ्या मुलाच्या मृत्यूला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल जबाबदार आहेत. आता मला पण गोळ्या घाला. राज्य सरकारने माझ्या मुलाची सुरक्षा काढून घेतली, तर भगवंत मान यांच्या बहिणीचे रक्षण करण्यासाठी २० सुरक्षा रक्षक आहेत.
दरम्यान, मुसेवाला यांच्या वडिलांनी या हत्येप्रकरणी मानसा येथे एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, सिद्धू मुसेवाला यांच्यासोबत बुलेटप्रूफ वाहन नव्हते किंवा पंजाब पोलिसांचे दोन्ही कमांडो त्यांच्यासोबत नव्हते.