कडक उन्हातून आल्याआल्या अजिबात करू नका ४ चुका, ऊन जीवावर बेतायचं…

राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढला असून दिवसाचे २४ तास अंगाची नुसती लाहीलाही होत आहे. अशात बाहेरची कामे करायची म्हणजे दिव्यच. पण रोजच्या गरजेचे सामान आणणे, बँकांची कामे, इतर काही ना काही कामांसाठी घराच्या बाहेर पडावेच लागते. ज्यांचा मार्केटींगचा किंवा बाहेर फिरण्याचा जॉब आहे त्यांच्यासाठी तर हा ऊन्हाळा म्हणजे महासंकट असल्यासारखाच आहे. सकाळी ९ वाजल्यापासून पडणारे ऊन संध्याकाळी ६ पर्यंत कमी व्हायचे नाव घेत नाही. अशावेळी उन्हातून घरी किंवा ऑफिसमध्ये आल्यावर काही गोष्टीची आवर्जून काळजी घ्यायला हवी. नाहीतर तब्येतीच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या उन्हातून आल्याआल्या करु नयेत त्याविषयी जाणून घेऊया……

 


१. उन्हातून आल्या आल्या काही वेळ शांत बसावे. घाईघाईने येऊन लगेच काहीतरी काम करायला लागलो तर चक्कर येण्याची शक्यता असते. याचे कारण बाहेर प्रखर ऊन आणि घरात किंवा ऑफीसमध्ये सावली आणि थंडावा असतो. त्यामुळे उन्हातून आल्याआल्या ५ मिनीटे डोळे मिटून शांत बसून राहावे.

२. बाहेरच्या कडक उन्हातून आल्यावर आपल्याला साहजिकच तहान लागते. मात्र आल्या आल्या गटागटा पाणी प्यायले तर त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ५ ते १० मिनीटे थांबून पाणी प्यावे. त्याआधी गुळाचा एखादा खडा तोंडात टाकल्यास ऊन बाधत नाही. लाहीलाही झाली म्हणून अनेक जण फ्रिजमधले गार पाणी पितात. मात्र फ्रिजचे पाणी बाधण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो माठातले किंवा साधे पाणी प्यावे.

३. उन्हातून आल्यावर आपल्याला गरम होत असल्याने आपण घरात आल्या आल्या मोठ्या फॅनखाली किंवा कूलरसमोर बसतो. मात्र आपल्या शरीराचे तापमान थोडे सामान्य व्हायला वेळ लागतो. त्यातच आपल्याला घाम आला असेल तर या घामावर वारे बसल्यामुळे त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून उन्हातून आल्याआल्या अंगावर गार वारे घेऊ नये.

४. उन्हातून आल्यावर अनेकांना लगेच चेहऱ्यावर, हातापायावर पाणी मारावेसे वाटते. जेणेकरुन गार वाटेल, पण असे करणे योग्य नाही. कारण बाहेरचे तापमान, शरीराचे तापमान आणि पाण्याचे तापमान हे वेगवेगळे असल्याने शरीरावर त्याचा विपरित परीणाम होऊ शकतो. त्यामुळे आधी सुती कापडाने घाम पुसावा आणि मग १० मिनीटांनी चेहरा, हात-पाय पाण्याने धुवावेत.

Share