माफिया ठाकरे सरकारसमोर नमणार नाही -किरीट सोमय्या

मुंबई : भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी सकाळी दिल्लीत केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची भेट घेऊन दिल्लीतील विशेष पथक महाराष्ट्रात पाठवून सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी केली. दरम्यान, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार हे माफिया सरकार आहे. या माफिया सरकारसमोर नमणार नाही, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती बडनेराचे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा वाचण्याचा निर्धार केला होता; पण शिवसैनिकांनी राणांच्या खार येथील घराला घेराव घालत आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी राणा दाम्पत्यास अटक केली. शनिवारी मध्यरात्री राणा दाम्पत्यास भेटण्यासाठी खार पोलिस ठाण्यात गेलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांना झेड दर्जाची सुरक्षा असतानाही पोलिसांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर दगड भिरकावला. यामध्ये सोमय्या जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी सोमय्या यांना अपेक्षित असलेला एफआयआर दाखल करून घेण्यासही नकार दिला होता. या सगळ्याविरोधात दाद मागण्यासाठी भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी सकाळी केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. या शिष्टमंडळात आ. मिहिर कोटेचा, आ. अमित साटम, आ. पराग शाह, आ. राहुल नार्वेकर, विनोद मिश्रा आदींचा समावेश होता.

केंद्रीय गृह सचिवांची भेट घेण्‍यासाठी दिल्लीला जाण्यापूर्वी प्रसारमाध्‍यमांशी बाेलताना किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा तोफ डागली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या संगनमताने माझ्यावर हल्ला झाल्याचा आरोप करून सोमय्या यांनी ठाकरे सरकार व पोलिस प्रशासनाच्‍या भूमिकेवर प्रश्‍न उपस्‍थित केले. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पोलिसांच्या आधारे माफियाराज चालवत आहेत. राज्‍यातील महाविकास आघाडीचे सरकार हे माफिया सरकार आहे. किरीट सोमय्या या माफिया सरकारसमोर नमणार नाही. भाजप नेत्यांवर राजरोसपणे हल्ले होत आहेत. राज्यात गुंडागर्दी सुरू आहे. शिवसेनेचे गुंड लोकांच्या घरात घुसत आहेत. राज्यातील सर्व घटनांची चौकशी करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याची मागणी आम्ही केंद्रीय गृहसचिवांकडे करणार आहोत, अशी माहिती सोमय्या यांनी दिली. माझ्यावर झालेल्या हल्ल्याचा तपास झाला पाहिजे, अशी मागणीही त्‍यांनी केली.

ठाकरे सरकारसह मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारसह मुंबई पोलिस आयुक्तांवर गंभीर आरोप केले आहेत. ‘माझ्यावर एकदा नव्हे तर तीनवेळा पोलिसांच्या मदतीने हल्ला करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या उद्धटगिरीला सीमा राहिलेली नाही. पोलिसांकडून खोटा एफआयआर दाखल करण्यात येत आहे. तुम्हाला २० फूट खाली गाडू अशी धमकी शिवसेनेचे प्रवक्ते देतात. आम्ही या सगळ्या घटनांची सविस्तर माहिती केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांना दिली, असे सोमय्या यांनी सांगितले.

Share