‘या’ नंबर्सवरून कॉल आल्यास रिसिव्ह करू नका!

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. केवायसी अपडेटच्या नावाखाली फसवणूक होत आहे. याबाबत बँकांकडून त्यांच्या ग्राहकांना वेळोवेळी सावध केले जाते. आता स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने आपल्या खातेधारकांना पुन्हा एकदा सावध केले आहे. बँकेने बनावट फोन कॉलबाबत खातेधारकांना सतर्क केले आहे.

सायबर गुन्हेगार नागरिकांच्या फसवणुकीसाठी वेगवेगळा फंडा वापरत आहेत. बनावट कॉलचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, ज्यामुळे खातेधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे एसबीआयने आपल्या खातेधारकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत याबाबत खातेधारकांना सावध केले आहे. +९१८२९४७१०९४६ आणि +९१७३६२९५१९७३  या नंबरचा वापर फिशिंग स्कॅमसाठी केला जात आहे. तसेच बँकेच्या नावानेदेखील फसवणूक केली जात आहे. बनावट अधिकारी बनून केवायसी अपडेटच्या नावाखाली फिशिंग अटॅक केले जात आहे. त्यामुळे या नंबरवरून कॉल आल्यास उचलू नये, असे एसबीआयने म्हटले आहे.

दरम्यान, फिशिंग अटॅक दरम्यान लोकांना ई-मेल, मेसेज आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून लिंक पाठवली जाते. या लिंकवर क्लिक केल्यानंतर युजर्सच्या फोनला रिमोट कंट्रोल केले जाते आणि फोनमधील सर्व खासगी व बँकेशी संबंधित माहिती चोरी केली जाते. या माहितीचा वापर करून युजर्सचे बँक खाते रिकामे करतात. त्यामुळे अशा अनोळखी नंबर व धोकादायक लिंकपासून सावध राहायला हवे. तसेच कोणालाही बँक खाते व ओटीपीसंदर्भात माहिती शेअर करू नये, असे एसबीआयने सूचित केले आहे.

Share