भाजपच्या उपटसुंभांचा ‘छंद’ आपल्याला दिसत नाही का?

मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांच्यात ट्विटर वार सुरू असल्याचे दिसून येत आहे. चंद्रकांतदादांवर टिका करण्याइतके रोहित पवार मोठे नसल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याला आता आ. रोहित पवार यांनी प्रत्युतर दिले आहे. पवार साहेबांच्या राजकीय कारकिर्दीएवढंही वय नसलेल्या भाजपातील काही उपटसुंभांचा साहेब व इतर नेत्यांविषयी खालच्या पातळीवरची भाषा वापरण्याचा ‘छंद’ आपल्याला दिसत नाही का? असा सवाल रोहित पवारांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार
दरेकर साहेब वयाचा विचार करायचा तर आदरणीय पवार साहेबांच्या राजकीय कारकिर्दीएवढंही वय नसलेल्या भाजपातील काही उपटसुंभांचा साहेब व इतर नेत्यांविषयी खालच्या पातळीवरची भाषा वापरण्याचा ‘छंद’ आपल्याला दिसत नाही का? अशांना महत्त्व देत नाही, पण ते गरळ ओकताना भाजपचे मोठे नेते का गप्प बसतात?, असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.

तसेच मोठ्या नेत्यांना सल्ला देणं/त्यांच्यावर हल्ला करण्याएवढा मी मोठा नसल्याची मला जाणीव आहे. पण राज्यातील तुमच्या पक्षातील मोठ्या नेत्यांकडून राजकीय समंजसपणाची अपेक्षा करणं काही गैर नाही. कारण मोठे नेतेच चुकीचं वागले तर त्याचं अनुकरण लहानही करत असतात. आणि हेच मोठे नेते चुकीचं समर्थन करत असतील तर महाराष्ट्रात आजवरच्या नेत्यांनी निर्माण केलेल्या सुसंस्कृत राजकारणाच्या परंपरेला तडा जाण्याचीही भीती वाटते. महाराष्ट्राप्रमाणे देशात इतरत्र कुठंही दिसत नसलेली ही राजकीय संस्कृती खरंतर आपण सर्वांनीच जपायला हवी. असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते प्रवीण दरेकर

चंद्रकांतदादांवर टीका करण्याइतके रोहित पवार मोठे नसल्याचे दरेकर म्हणाले. पवार साहेब किंवा दुसरे पवार आहेत त्यामुळे रोहित पवार यांनी चंद्रकांतदादा यांना सल्ला देऊ नयेत असेही ते म्हणाले. चंद्रकांतदादांनी हे सगळं करायला सांगितलं आहे का? मग टीका कशाला करता. रोहित पवार हे बुजुर्गपणाचा आव आणत आहेत असेही दरेकर म्हणाले होते. मला वाटतं रोहित पवार अजून लहान आहेत. चंद्रकांतदादांवर टीका करायला मोठे पवार आहेत, त्यानंतर दोन नंबरचे पवार आहे. त्यामुळे त्यांनी चंद्रकांतदादांना सल्ला देण्याची घाई करु नये असे दरेकर म्हणाले होते. रोहित पवार हे आपल्यापेक्षा जास्त क्षमता असललेल्या नेत्यांवर टीका करत आहेत असे दरेकर म्हणाले होते.

Share