रोमांचक सामन्यात केकेआरला नमवून लखनौ संघ प्लेऑफमध्ये दाखल

मुंबई : फक्त एका चेंडूमुळे कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) चा संघ आयपीएल-२०२२ मधून आऊट झाल्याचे पाहायला मिळाले. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या रोमांचक सामन्यात केकेआरला अखेरच्या चेंडूवर दोन धावांनी पराभव पत्करावा लागला. २११ धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सने हा सामना जवळपास जिंकला होता; पण शेवटच्या षटकात रिंकू सिंहची विकेट पडल्याने त्यांचे स्वप्न भंगले. कोलकाता संघाला शेवटच्या चेंडूवर ३ धावांची गरज होती;परंतु इथे विकेट पडली आणि लखनौचा संघ जिंकला. या विजयासह लखनौ सुपर जायंट्स संघाने प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. प्लेऑफमध्ये पोहोचणारा लखनौ सुपर जायंट्स हा दुसरा संघ ठरला आहे.

नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर बुधवारी (१८ मे) खेळवल्या गेलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात एकही विकेट न गमावता २१० धावा केल्या. लखनौ संघाकडून क्विंटन डी कॉकने १४० आणि कर्णधार के. एल. राहुलने ६८ धावांची नाबाद खेळी केली. क्विंटन डी कॉकने या मोसमातील पहिले शतक झळकावले. त्याने ७० चेंडूत १० चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने नाबाद १४० धावा केल्या. आयपीएलमधील डी कॉकची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याचवेळी कर्णधार के. एल. राहुलने ५१ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकार फटकावत नाबाद ६८ धावांची खेळी केली. या दोघांनी २१० धावांची सलामी भागीदारी केली. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी सलामीची भागीदारी आहे.

क्विंटन डीकॉकने सावधपणे सुरुवात केली असली तरी त्याला तिसऱ्या षटकात जीवदान मिळाले. डीकॉक त्यावेळी १२ धावांवर फलंदाजी करत असताना त्याचा झेल सुटला आणि त्यानंतर लखनौच्या संघाचे नशीबच बदलले. कारण त्यानंतर डीकॉकने धडाकेबाज फटकेबाजी करत ३६ चेंडूंत आपले अर्धशतक साकारले. अर्धशतक साकारताना त्याच्या खात्यामध्ये चार चौकार आणि दोन षटकार होते. त्यानंतर लखनौच्या संघाने ७७ चेंडूंमध्ये आपले शतक फलकावर लावले. डीकॉक पाठोपाठ यावेळी कर्णधार के. एल. राहुलनेही अर्धशतक पूर्ण केले. राहुलला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी यावेळी ४१ चेंडू लागले, यामध्ये दोन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. त्यानंतर डीकॉकने शतक झळकावले आणि त्यानंतर तो प्रत्येक चेंडूवर मोठे फटके मारायला लागला. डीकॉकने यावेळी ७० चेंडूंत १० चौकार आणि १० षटकारांच्या जोरावर नाबाद १४० धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

क्विंटन डी कॉकचे सहा वर्षानंतर दुसरे शतक

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या या महत्त्वाच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा तडाखेबज फलंदाज क्विंटन डी कॉकने शतक झळकावले. चालू मोसमात शतक ठोकणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. आयपीएलमधील त्याचे हे दुसरे शतक आहे. त्याने २०१६ मध्ये पहिले शतक झळकावले होते. डी कॉकने सहा वर्षानंतर दुसरे शतक झळकावले आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये यापूर्वी जोस बटलरने राजस्थान रॉयल्ससाठी ३ शतके झळकावली आहेत आणि लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार के.एल. राहुलने २ शतके झळकावली आहेत. डी कॉक चालू हंगामात लखनऊकडून खेळत आहे. त्याने ५९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने शतक झळकावले आहे.

अखेरच्या तीन षटकांत पलटला होता संपूर्ण सामना
क्विंटन डीकॉकच्या नाबाद १४० धावांच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) पुढे २११ धावांचे आव्हान ठेवले होते. केकेआरच्या संघाने चांगली लढत दिली; परंतु जिंकता जिंकता त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. २११ धावांचा पाठलाग करताना केकेआरची वाईट सुरुवात झाली. त्यांना पहिल्याच षटकात धक्का बसला. कारण चौथ्याच चेंडूवर सलामीवीर वेंकटेश अय्यर भोपळाही न फोडता बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या षटकात केकेआरला दुसरा धक्का बसला आणि त्यांची २ बाद ९ धावा अशी अवस्था झाली; पण त्यानंतर नितीश राणा आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी केकेआरचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी रचली. मात्र, त्यानंतर राणा ४२ धावांवर बाद झाला आणि ही जोडी संपुष्टात आली. त्यानंतर अय्यरने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत अर्धशतक झळकावले; पण अर्धशतकानंतर त्याला एकही धाव करता आली नाही. अय्यरने यावेळी २९ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर ५० धावांची खेळी साकारली.

रिंकू सिंहची वादळी खेळी व्यर्थ

कोलकाता नाईट रायडर्सला शेवटच्या तीन षटकात ५५ धावांची गरज होती. मात्र, त्यांना फक्त ५३ धावा करता आल्या. केकेआरच्या रिंकू सिंहने अशी काही खेळी खेळली, जी वर्षातून एकदा खेळली जाते; पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. रिंकू सिंहने १५ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह ४० धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सला शेवटच्या षटकात २१ धावांची गरज होती आणि रिंकू सिंह क्रीजवर होता. लखनौ संघाकडून मार्कस स्टॉइनिसने चेंडू हातात घेतला आणि शेवटच्या षटकात त्याने २ बळी घेतले आणि १८ धावा दिल्या.

अखेरच्या चेंडूवर तीन धावांची गरज असताना लखनौच्या मार्कस स्टॉइनिसने उमेश यादवला क्लीन बोल्ड केले आणि केकेआरचे आव्हान संपुष्टात आले. लखनौ संघाने यावेळी दोन धावांनी विजय साकारला आणि त्यांनी प्ले ऑफमधील स्थान निश्चित केले.

Share