डॉ. निलंगेकर कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा राहणार : माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर 

निलंगा : डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्याचा असून तो शेतकऱ्यांच्या मालकीचा राहणार आहे. कारखाना सुरळीत व व्यवस्थित चालवण्यासाठी आपण करखाना प्रशासनात आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.  रविवार दि. ३० ऑक्टोबर रोजी अंबुलगा येथील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना लीज ओंकार साखर कारखाना च्या प्रथम बॉयलर अग्निप्रदिपन सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी  माजी खा. रूपाताई पाटील निलंगेकर, माजी आ. गोविंद केंद्रे, ओंकार कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे, पाटील,रेखा बोत्रे, पाटील लोकमंगल ग्रुपचे संचालक अविनाश महागावकर पाटील, दगडू सोळुंके, माजी जि. प. उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके, भाजपा तालुकाध्यक्ष शाहूराज थेटे, मंगेश पाटील, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले की,  मी कारखानदार नाही. व्यावसायिक नाही. राजकीय क्षेत्रात काम करणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे. काम करणे व त्यांना न्याय मिळवून देणे हे माझे कर्तव्य आहे. कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी मोठ्या कष्टाने हा कारखाना उभा केला आहे. या कारखान्याला उर्जित अवस्था प्राप्त करून देण्यासाठी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी या कारखान्याची सुरुवात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून कारखान्याला ऊस द्यावा. ऊस वेळेत गाळप होण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या उसाची कारखाना प्रशासनाकडे नोंद करून घेण्याचे आवाहनही निलंगेकर यांनी केले. कारखान्याने शेतकऱ्याच्या ऊसाला एफआरपीप्रमाणे भाव देण्यात येईल ऊस तोडीच्या कार्यक्रमानुसार ऊस तोडणी करावी, डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर कारखान्याला मराठवाड्यात आपण नावलौकिक मिळवून देऊ शेतकऱ्यांच्या हितासाठी चालू केलेला हा कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा असेल, असेही संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बाबुराव बोत्रे म्हणाले की,  आमदार निलंगेकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा कारखाना गाळपासाठी सज्ज झाला आहे. आमदार निलंगेकर यांनी केलेल्या आवाहनानुसार शेतकऱ्याचा ऊस वेळेच्या आतच नेला जाईल. तोड झालेल्या उसाचे पंधरा दिवसाच्या आत पेमेंट देणार असल्याचेही ते म्हणाले रोज पाच ते सहा हजारात गाळपाचे उद्दिष्टही पूर्ण करणार असून राज्यात हा कारखाना आदर्शवत चालून दाखऊ, अशी ग्वाही कारखान्याचे चेअरमन धोत्रे पाटील यांनी दिली. यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याचे चेअरमन बोत्रे पाटील यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेषराव ममाळे यांनी केले.

Share