लातूर : निलंगा तालुक्यातील अंबुलगा (बु) येथील शिवाजी पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना (लिज) ओंकार कारखाना दुरुस्तीचे ८५ टक्के पूर्ण झाले आहे. हा कारखाना ज्यांचे स्वप्न व शेतकरी कल्याणाचे ध्येय राहिले होते, असे लोकनेते डाॅ. शिवाजी पाटील निलंगेकर यांच्या स्वप्नांची पूर्तता हेच आमचे एकमेव ध्येय असेल. लवकरच पूर्ण क्षमतेने गळीत सुरू होणार आहे. अत्याधुनिक मशिनरीचा वापर करण्यात आल्याने हा कारखाना सक्षमपणे चालवून दाखवू, अशी ग्वाही चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी दिली.
गेल्या एक तपापासून बंद असलेला डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना सुरू होणार की नाही यावर संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, राज्य शिखर बँकेने हा कारखाना ओंकार साखर कारखान्यास भाडेतत्वावर चालवण्यासाठी दिला आहे. कारखान्याच्या दुरूस्ती युध्द पातळीवर सुरू असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्ण क्षमतेने गाळप हंगाम सुरू करणार आहे. कारखान्यात अधुनिक तंत्रज्ञानामुळे अनावश्यक खर्च टाळून शेतकऱ्यांच्या ऊसाला अधिकचा भाव देण्याचा प्रयत्न असल्याचे बोत्रे यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्राच्या धरतीवर कारखाना परीसरात ऊसाच्या अनेक नविन व चांगला साखर उतारा तसेच टनेज देणाऱ्या जातीचे ऊस बेणे प्लांट प्रात्यक्षिक विकसित करण्यात येणार आहेत. तसेच को-जनरेशन व डिस्टलरी प्रकल्प सुरू करण्यात येणार असून माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नाने मंजूरी मिळाली असून लवकरात लवकर प्रकल्प पूर्णत्यासाठीचे प्रयत्न आहेत.
गतवर्षी कारखान्याला ऊस घालण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली होती काही शेतकऱ्यांनी ऊस फडाबाहेर निघत नसल्यामुळे कंटाळून उभ्या ऊसाला पेटवून देण्याचे प्रकार तालुक्यात घडले होते. अनेक शेतकऱ्यांचा ऊस सत्तरा आठरा महिने फडातच उभा राहिल्याने मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला होता. शेतकऱ्यांची होणारी हेळसांड लक्षात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव व वेळेत ऊस फडाबाहेर काढण्याचा आमदार निलंगेकर यांचा हेतू आहे. म्हणूनच कारखाना परीसरात को-जनरेशन व डिस्टलरी प्रकल्प आमदार निलंगेकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे. लवकरच हे दोन्ही प्रकल्प सुरू होतील, असा विश्वास बोत्रे यांनी व्यक्त केला.
हा कारखाना चालू झाल्यामुळे कारखाना आणि परीसरातील दहा हजार लोकांची वर्दळ वाढणार असून निलंगा शहरात व परीसरातील व्यापाराला चालना मिळणार आहे, असा आशावाद बोञे पाटील यांनी व्यक्त केला आहे. स्पर्धेच्या युगात साखर कारखानदारीपुढे खुप मोठे अव्हान आहेत. ते पेलण्यासाठी उच्च व गुणवत्तापूर्ण साखर निर्माण व्हावी म्हणून अत्याधुनिक मशिनरी बसवण्यात आली आहे. यामुळे उच्च प्रतिची साखर निर्माण होणार आहे.त्यामुळे साखरेला चांगला भाव मिळणार आहे. ही अत्याधुनिक मशिनरी असून देशातील तीन कारखान्याकडे आहे. निलंगा येथील निलंगेकर कारखान्याचा राज्यात चौथा क्रमांक असल्याचे ते म्हणाले.