Diwali 2022| आज वसुबारस म्हणजेच, गोवत्स द्वादशी! काय आहे महत्त्व?

आजपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. आज गोवत्स द्वादशी म्हणजेच, वसुबारस. आश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस साजरी केले जाते. गोवत्सद्वादशी म्हणजे गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. वसु म्हणजे द्रव्य अर्थात धन त्यासाठी असलेली बारस म्हणजेच, द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असे म्हणतात.

भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्‍यात आला असून, ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्‍याप्रतीच्‍या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते. आश्‍विन वद्य द्वादशी, या तिथीला वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी असे म्हणतात. समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या, अशी कथा आहे. त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून वसुबारस हे व्रत करण्यात येतं. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात.

वसुबारस व्रत :
या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. या दिवशी तेलातुपात तळलेले पदार्थ आणि गायीचे दूध, तूप व ताक खात नाहीत. उडदाचे वडे, भात व गोडधोडाचे पदार्थ करून ते गायीला खाऊ घालतात. घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरू असलेल्या गायीची पूजा करण्याची पद्धत आहे. घरातील सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात. हळद-कुंकू आणि अक्षता वाहतात. ज्यांच्या घरी गुरे, वारसे आहेत, त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गाईला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो. समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे.

वसुबारस म्हणजेच गोवत्सद्वादशी हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीतही केला जातो. पण तंस पाहायला गेलं तर, तो सण वेगळा असल्याचं सांगण्यात येतं. मात्र, देशातील बहुतांश ठिकाणी वसुबारसेपासूनच दिवाळीला सुरुवात होते, असं मानलं जातं. यंदा शुक्रवार, म्हणजेच, २१ ऑक्टोबर २०२२ रोजी निज अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजे वसुबारस आहे. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन (द्रव्य), त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.

Share