मुंबई- राज्यात आयकर विभाग आणि ईडीच्या कारवाईंचे सत्र सुरुच आहे. मागील आठवड्यात ईडीने राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडीने आठ तास चौकशी करत त्यांना अटक केली आहे. आता राज्याचे उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांच्यावर ईडीने करावाई केली आहे. त्यामुळे ईडी राष्ट्रवादीच्या मुळावर उठली आहे का? असा सवाल निर्माण होतो.
उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांच्या राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. जवळपास १३ कोटी ४१ लाख रुपयाची ही मालमत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. तनपुरे यांच्या कारखान्यावरील मालमत्ता जप्तीच्या कारवाईचा फटका काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनाही बसला आहे. राम गणेश गडकरी साखर कारखान्याची नागपूरमधली ९० एकर जमीन काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्या तक्षशिला सिक्युरिटीजने खरेदी केली होती. ईडीने ही संपत्तीसुद्धा जप्त केली आहे. एकूण १३ कोटी ४१ लाख रूपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. यामध्ये नागपूरमधील कारखान्याची ९० एकर जमीन आहे तर अहमदनगरमधील ४ एकर जमीनीचा समावेश आहे.
याआधी राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणी प्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. तर नवाब मलिक यांच्यावर दाऊदशी संबंध असलेल्या व्यक्तींसोबत व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता प्राजक्त तनपूरे हे देखील ईडीच्य़ा रडावर असल्याचे समजते.