शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापूर : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांच्या परिवर्तन घडणविण्यासाठी  प्रयत्नशील आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना वीजेची कोणतीही अडचण भासणार नाही, यासाठी वीजेचे सर्व फिडर सौरउर्जेवर आणणार आहे. यातून चार हजार मेगावॅट वीजेचे उद्दिष्ट ठेवले असून यातून येत्या काळात शेतकऱ्यांना १२ तास वीज देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बार्शी येथे विविध विकास कामांच्या ऑनलाईन लोकार्पण आणि भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे असून शेतकरी, कष्टकरी, सामान्य नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी शक्ती द्यावी, अशी मागणी भगवंताकडे केली आहे. सोलर फिडरसाठी शेतकऱ्यांची जमीन हेक्टरी ७५ हजार रूपये भाड्याने घेणार असून यातून शेतकऱ्यांना शाश्वत भाडे मिळेल. याबरोबरच ३० वर्षांनी जमीन परत दिली जाईल.यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडणार आहे.

गेल्या तीन महिन्यात सात हजार कोटींची मदत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केली आहे. एनडीआरएफ निकषाच्या दुप्पट पैसे आणि दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पूर्वी ६५ मिली पावसाच्या अटीमध्ये बदल करून सातत्याने सात-आठ दिवस पाऊस पडून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास मदत देण्याच्या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. यापोटी बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना ८० कोटींची मदत देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Share