नवी दिल्ली : राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या ५७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने या निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार १० जून २०२२ रोजी या ५७ जागांसाठी मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांना ३१ मेपर्यंत अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेले शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे पी. चिदंबरम, भाजपचे विनय सहस्त्रबुद्धे, पीयुष गोयल आणि विकास महात्मे यांचा खासदारकीचा कार्यकाळ संपला आहे. तसेच जुलैमध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार असल्याने त्यापूर्वी राज्यसभा निवडणूक होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. राऊत, पटेल यांच्यासह ६ जणांची मुदत संपल्याने रिक्त होणाऱ्या या ६ जागांवर विद्यमान खासदारांपैकी पुन्हा कोणाला संधी मिळणार की, या ठिकाणी नवीन चेहरे दिसणार याची जनतेत उत्सुकता आहे.
राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ५७ जागांसाठीचा द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या १० जून रोजी राज्यसभेच्या ५७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. राज्यसभेच्या ५७ जागा या १५ राज्यांमधील आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, पंजाब, मध्यप्रदेश, कर्नाटक, ओडिशा, राजस्थान, उत्तराखंड, बिहार , झारखंड आणि हरियाणा राज्यांतील जागांचा त्यामध्ये समावेश आहे. उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक ११, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधून प्रत्येकी ६, बिहारमधून ५ आणि राजस्थान आणि कर्नाटकमधून प्रत्येकी ४ जागांवर निवडणूक होणार आहे. २४ मे रोजी ५७ जागांसाठी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
येत्या तीन महिन्यांत रिक्त होणाऱ्या जागांसाठीचादेखील निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला. राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये भाजपचे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, पीयूष गोयल, निर्मला सीतारामन, काँग्रेसच्या अंबिका सोनी, जेडीयूचे के.सी. त्यागी अशा दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. आज (गुरुवारी) राज्यसभेत या सदस्यांच्या निरोपाचा औपचारिक सोहळा पार पडणार होता. मात्र, भाजपचे राज्यसभेचे खासदार प्रवीण राष्ट्रपाल यांच्या निधनाचे वृत्त राज्यसभेत येताच राज्यसभेने दिवंगत सदस्याला श्रद्धांजली अर्पण करून सभा तहकूब केली.
संभाजीराजे छत्रपती अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार
महाराष्ट्रातील संजय राऊत, विकास महात्मे, पीयूष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे, प्रफुल्ल पटेल आणि पी. चिदंबरम या राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या ६ जागांसाठी १० जूनला मतदान होणार आहे. राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून कार्यकाळ संपलेल्या संभाजीराजे छत्रपती यांनी आजच पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपण अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. सध्याच्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजपचे २, राष्ट्रवादी काँग्रेसचा १, शिवसेनेचा १ आणि काँग्रेसचा १ खासदार निवडून येऊ शकतो. सहाव्या जागेवर संभाजीराजे छत्रपती यांनी दावेदारी सांगितली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कुणाचा पत्ता कट होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.