काँग्रेसमध्ये घराणेशाहीची परंपरा कायम 

मुंबई :  महाराष्ट्र युवक काॅंग्रेसच्या अध्यक्षपदी कुणाल राऊत यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी  जारी केलेल्या पत्राद्वारे कुणाल राऊत यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. कुणाल राऊत यांची नियुक्तीची घोषणा झाल्यानंतर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके उडवून व मिठाई वाटप करून आनंद साजरा केला.

युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात कुणाल राऊत यांना निवडणुकीत सर्वाधिक ५,४८,२६७ मते मिळाली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवराज मोरे यांना ३,८०,३६७ तर शरण बसवराज पाटील यांना २,४६,६९५ मते मिळाली होती. त्यामुळे राऊत यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा उरली होती.

कोण आहेत कुणाल राऊत?

कुणाल राऊत हे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र आहेत. त्यांचा जन्म १७ फेब्रुवारी १९८९ रोजी झाला. विद्यार्थी दशेतच त्यांनी राजकारण आणि समाजकारण यात रस घेण्यास सुरुवात केली. संकल्प या स्वयंसेवी स्ंस्थेच्या माध्यमातून त्यांनी  समाजकार्यास प्रारंभ केला. त्यानंतर काँग्रेसच्या एनएसयुआय या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष सुरू केला. एनएसयुआयचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी २००९ पासून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते सलग दोनदा निवडणुकीच्या माध्यमातून युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून निवडून आले. तसेच २०१८ च्या युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत ते युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले.

Share