दहावी-बारावीचे परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत, तर दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांना २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.

परीक्षा देण्यासाठी इच्छुक असणारे नियमित विद्यार्थी, व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी; तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे (आयटीआय) ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज शाळा, महाविद्यालयांमार्फत ऑनलाइन पद्धतीने www.mahahsscboard.in या वेबसाइटवर भरायचे आहेत.

बारावीच्या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह अर्ज करण्याची मुदत ५ नोव्हेंबरला, तर दहावीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डेटाबेसवरून भरायची मुदत १० नोव्हेंबरला संपणार होती. मात्र, त्याला मुदतवाढ देण्यात आली. दहावीची परीक्षा देणारे पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी; तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी २५ नोव्हेंबरची मुदत देण्यात आली आहे.

माध्यमिक शाळांना चलनाद्वारे बँकेत शुल्क भरण्यासाठी २९ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्री-लिस्ट (यादी) चलनासोबत विभागीय मंडळात जमा करण्यासाठी १ डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे. बारावीसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत (नियमित शुल्कासह); तसेच १६ ते ३० नोव्हेंबर (विलंब शुल्कासह) अर्ज भरण्याची संधी देण्यात आली आहे. उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी चलनाद्वारे बँकेत शुल्क भरण्यासाठी २ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आल्याचे ओक यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

Share