वाढत्या करोना संसर्गामुळे दिल्लीत परत एकदा मास्कसक्ती

दिल्ली: दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढत आहे. या संसर्गाला आळा घालण्यासाठी दिल्लीत परत एकदा सार्वजनिक ठिकाणी मास्कसक्ती करण्यात आली आहे. तसेच या नियमाचं पालन न केल्यास संबंधित व्यक्तीला ५०० रुपयाचा दंडही भरावा लागणार आहे.

दिल्लीत सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणं सक्तीचं होणार असल्याच्या दिवसभर चर्चा सुरु होत्या. यावर कुठलाही अधिकृत निर्णय झाला नव्हता. मात्र जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (DDMA) बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

 

कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली तरी शाळा अद्याप बंद होणार नाही. शाळांसाठी तज्ज्ञांशी बोलून मार्गदर्शक तत्व जारी केले जातील. यासोबत कोरोना चाचण्या देखील करण्यात येतील. लसीकरणाचा वेग वाढविण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रानं मंगळवारी दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र आणि मिझोराम या पाच राज्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग कुठेही पसरू नये यासाठी कठोर कारवाईचा इशारा दिला होता. गरज भासल्यास कठोर पावलं उचलण्याचा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे.

बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले होतं. तसेच मास्कसाठी दंड आकारण्याची कोणतीही योजना नसल्याचंही म्हटलं होतं. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली आणि चार राज्यांना “चाचणी, ट्रेसिंग, उपचार, लसीकरण आणि कोविड या पंचसूत्रीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच या पत्रात गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. कोरोनाच्या बाबतीत हलगर्जी करू नका. कोरोनाचा संसर्ग अधिक पसरू नये यासाठी काळजी घ्या, असं या पत्रात म्हटलं आहे.

Share