१० वर्षीय मुलीचा खून; सात महिलांना जन्मठेप

पाटणा : जमिनीच्या वादातून १० वर्षीय मुलीची हत्या केल्याप्रकरणी सात महिलांना बिहारमधील दरभंगा येथील न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयात तब्बल १३ वर्षे हा खटला चालला व न्यायालयाने १३ वर्षांनंतर हा निर्णय दिला आहे.

या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील विष्णुकांत चौधरी आणि रेणू कुमारी यांनी काम पाहिले. ते म्हणाले की, हायाघाट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील छटौना या गावातील योगेंद्र यादव यांची १० वर्षांची मुलगी राजवती कुमारी हिची जमिनीच्या वादातून १२ सप्टेंबर २००९ रोजी हत्या करण्यात आली होती. यादव यांनी १३ सप्टेंबर २००९ रोजी हायाघाट पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली होती.

फिर्यादीनुसार, १२ सप्टेंबर २००९ रोजी त्यांची मुलगी राजवती कुमारी जेवण घेऊन वडिलांकडे जात असताना आरोपी सात महिलांनी तिला बेदम मारहाण केली. यामुळे ती गंभीर जखमी झाली. राजवती कुमारी हिला हायाघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान रात्री उशिरा तिचा मृत्यू झाला. या प्रकरणातील सात महिला आरोपींविरुद्ध न्यायालयात ९ ऑगस्ट २०११ रोजी आरोप निश्चित करण्यात आला. या खटल्यात फिर्यादी पक्षातर्फे दहा साक्षीदारांनी साक्ष दिली. ज्यामध्ये शवविच्छेदन करणारे डॉ. पी. के. दास आणि तपास अधिकारी एम. पी. सिंग हे प्रमुख होते. न्यायालयाने १८ एप्रिल रोजी आरोपींना दोषी ठरवले होते. निकालासाठी प्रकरण राखून ठेवले होते. आज २० एप्रिल रोजी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश नवम संजीव कुमार सिंग यांनी आरोपी सात महिलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या सर्व महिला हायाघाट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील छटौना येथील रहिवासी आहेत. या महिलांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास त्यांना प्रत्येकी एक वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागेल. याशिवाय त्याला कलम १४७ अंतर्गत एक वर्षाच्या कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. सर्व शिक्षा एकाच वेळी भोगावयाच्या आहेत.

Share