राजकीय टोलेबाजीत विधान परिषदेत सदस्यांना निरोप

मुंबई- विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह नऊ सदस्यांचा निरोप समारंभ हास्यविनोद, राजकीय टोलेबाजी आणि अनुभवकथनातून चांगलाच रंगल्याच काल विधान परिषदेत पहायला मिळाल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर केलेल्या मिश्कील टिपण्यांनी सभागृह हास्यकल्लोळात बुडाले. निवडणुकीनंतर वरिष्ठ सभागृहातील भाजपचे संख्याबळ घटणार आहे.

सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विरोधी पक्षनेते प्रवीण दरकेर, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह रवींद्र फाटक, दिवाकर रावते, सदाभाऊ खोत, सुजितसिंह ठाकूर, प्रसाद लाड, संजय दौंड या दहा सदस्यांचा कालावधी जुलै महिन्यात संपत आहे. त्यांना विधान परिषदेत बुधवारी निरोप देण्यात आला. या वेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी सर्व सदस्यांची कामगिरी, अनुभव आदींबाबत विवेचन केले. भाजप आमदार प्रसाद लाड यांचे ‘लाड कुणी केले आणि त्यांनी प्रसाद कुणाला दिला’, हे त्यांचे त्यांनाच माहीत आहे, अशी मिश्कील टिप्पणी करून पवार म्हणाले, दरेकर यांना बँकिंगचा अनुभव असल्याने कोठे, कधी गुंतवणूक करायची व काढून घ्यायची, हे चांगलेच समजते. मनसेचे आमदार झाल्यावर नंतर ते भाजपमध्ये गेले व मोठे झाले. अल्पावधीत वरिष्ठांच्या जवळ जाण्याची त्यांच्याकडे कला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ जाऊन त्यांनी विश्वास संपादन केला. अन्य पक्षातून येऊन विरोधी पक्षनेते पदापर्यंत इतक्या वेगाने प्रगती करण्याची कला दरेकर यांनी कशी साधली, असा प्रश्न भाजपमधील जुन्या नेत्यांनाही पडला आहे, अशी टिप्पणी पवार यांनी केल्यावर सभागृहात एकच हशा पिकला.

Share