मनसे नेत्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुंबई : मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्याविरोधात मुंबईतील शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल शिवतीर्थबाहेर पळून जाताना पोलिसांशी झालेल्या झटापतीत एक महिला पोलिस कर्मचारी जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच प्रकरणी आता संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप देशपांडे हे काल रात्रीपासून गायब आहेत. मी वकिलांचा कायदेशीर सल्ला घेत असल्याचं त्यांनी एका व्हिडिओतून स्पष्ट केलं होतं. मात्र आता गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मुंबई पोलिसांकडून संदीप देशपांडे यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती असून त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.

नेमक काय घडलं ?

मुंबईतील शिवाजी पार्क राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. माध्यमांशी बोलणं झाल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेत असल्याचे सांगितले. त्यावेळी संदीप देशपांडे यांनी आम्ही तुमच्यासोबत येत असल्याचे पोलिसांना सांगितले. काही अंतर पोलिसांसोबत चालल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे देशपांडे यांच्या खासगी वाहनात बसले. या वाहनात पोलीस बसण्याचा प्रयत्न करत असताना ही कार भरधाव वेगाने निघून गेली. या दरम्यान एक महिला पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलिसांना गुंगारा देत पळ काढल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Share