अखेर जहीर इक्बालने दिली सोनाक्षी सिन्हासोबतच्या नात्याची जाहीर कबुली

मुंबई : बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल ही दोघे मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. हे दोघे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर बऱ्याच काळापासून होताना दिसत आहेत. दोघांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले होते. मात्र, आता सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या नात्याचा अखेर खुलासा झाला आहे. जहीर इक्बालने सोशल मीडियावर सोनाक्षीला ‘आय लव्ह यू’ म्हणत रिलेशनशिपच्या चर्चांना अखेर पुष्टी दिली आहे.

‘हम लाख छुपाएं प्यार मगर, दुनिया को पता चल जाएगा…’ हे ‘जान तेरे नाम’ या सिनेमातील गाणं प्रसिद्ध आहे. हे गाणं सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबाल यांना एकदम सूट होते. या दोघांनी कितीही लपवले तरीही दोघांच्या प्रेमाची बातमी आता सगळीकडे पसरली आहे. त्यांच्या अफेअरची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती; पण याबाबत दोघांनीही मौन बाळगले होते; परंतु आता जहीर इक्बालच्या एका पोस्टमुळे सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला आहे.

सोनाक्षी सिन्हा ही प्रसिद्ध अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आहे. सोनाक्षी सिन्हाचा २ जून रोजी वाढदिवस होता. सोनाक्षीच्या वाढदिवसाचे निमित्त साधून जहीर इकबालने एका जेंटलमॅनसारखे सोनाक्षीसाठी स्पेशल बर्थ डे पोस्ट शेअर करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जहीर इकबालने थोडी उशिरा ही पोस्ट शेअर केली; परंतु जहीरने या पोस्टला जे प्रेमाने भारलेले कॅप्शन दिले होते त्याने मात्र सोनाक्षीच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू उमलले असणार. जहीर इकबालने सोनाक्षीच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा सोनाक्षी… आय लव्ह यू… मला न मारल्याबद्दल धन्यवाद. येत्या काळात आपण असंच खात राहू. प्रेम आणि हास्य सर्वांशी शेअर करू.’

https://www.instagram.com/p/Ced11EcMJ8-/?utm_source=ig_web_copy_link

जहीरच्या या पोस्टवर सोनाक्षी सिन्हाने केलेली कमेंटदेखील चर्चेत आहे. प्रतिक्रिया देताना सोनाक्षीने लिहिले, “धन्यवाद… खूप प्रेम आणि आता मी तुला मारायला येत आहे.” जहीरच्या या पोस्टवर पत्रलेखा, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण शर्मा, तारा सुतारिया आणि हुमा कुरैशी यांनीदेखील कमेंट करून या दोघांवर प्रेम व्यक्त केले आहे. जहीर इकबालने काही तास आधी सोनाक्षी सिन्हासोबत मजा-मस्ती करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ एकदम प्लेन शूट केला गेला आहे. सोनाक्षी बर्गरचा आस्वाद घेताना दिसत आहे; पण जहीर तिला काहीतरी विनोद करून हसवताना दिसत आहे. दोघांचा तो व्हिडीओ पाहिला की, त्यांच्यातील केमिस्ट्री आणि स्ट्रॉंग बॉन्डिंगचा अंदाज आपल्याला येईलच. सोनाक्षीच्या या हटके व्हिडीओला शेअर करीत जहीर इकबालने लिहिले आहे, ”हॅप्पी बर्थडे Sonzzz. आय लव्ह यू. तुला खूप सारं आवडीचं फूड,फाइ्टस आणि लाफ्टर”.

जहीर इकबालने शेअर केलेल्या या व्हिडीओवर आणि कॅप्शनवर चाहते मात्र भरभरून प्रेमाचा वर्षाव लाइक्सच्या माध्यमातून करताना दिसत आहेत. चाहत्यांनीदेखील दोघांमधील केमिस्ट्री आणि स्वीट बॉन्डिंगला ‘क्यूट’ म्हटले आहे. बोललं जात आहे की, सोनाक्षी सिन्हासाठी केलेल्या पोस्टमध्ये जहीरने ‘आय लव्ह यू’ म्हणत एका अर्थाने तिच्याविषयी असलेल्या प्रेमाची कबुलीच दिली आहे आणि आपल्या रिलेशनशिपलादेखील कन्फर्म केले आहे, अशी चर्चा आहे. दरम्यान, सोनाक्षीने एका मुलाखतीत म्हटले होते की, तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले त्यावेळी ती एका व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. तिचे हे नाते पाच वर्षे चालले;पण नंतर त्यांचे ब्रेकअप झाले.

जहीर इकबालचा जन्म १० डिसेंबर १९८८ रोजी मुंबईत एका श्रीमंत कुटुंबात झाला आहे. त्याच्या कुटुंबाचा दागिन्यांचा व्यापार आहे. सिनेसृष्टीशी जहीरच्या कुटुंबाचा तसा फारसा संबंध नाही; पण सलमान खान आणि जहीरचे वडील इकबाल रत्नासी हे लहानपणापासूनचे मित्र आहेत. त्यामुळे बॉलिवूडशी जहीरच्या कुटुंबाचे तसे खास नाते आहे असे म्हणायला हरकत नाही. सलमान खान त्याची बहीण अर्पिताच्या लग्नात जहीरला भेटला होता. तेव्हा सलमानला त्याच्यात अभिनेत्याचे गुण दिसले अन् त्याने जहीरला ‘नोटबूक’ या सिनेमातून लॉन्च केले. सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल लवकरच ‘डबल एक्सएल’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात हुमा कुरैशीचीसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

Share