भाजपच्या ‘हर घर तिरंगा’ इव्हेंटसाठी चीनमधून झेंड्यांची आयात – नाना पटोले

मुंबई : अत्याचारी ब्रिटिशी सत्तेला हाकलून लावण्यासाठई मोठा व प्रदीर्घ लढा द्यावा लागला. काॅँग्रेसच्या झेंड्याखाली देश एकवटला आणि सर्वांना बरोबर घेऊ जाण्याच्या काॅंग्रेस विचाराने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे काहीही योगदान नाही ते लोक आज हर घर तिरंगा अभियानाच्या नावाखाली इव्हेटबाजी करत आहेत. या इव्हेंटबाजीसाठी चीनमधून तिरंगा झेंड्यांची आयात करण्यात आली. हा स्वातंत्र्यसैनिकांचा व तिरंगा झेंड्याचा अपमान आहे, असे काॅँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र काॅंग्रेस प्रदेश कामिटीतर्फ राज्यातील सर्व जिल्ह्यात आझादी गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले असून काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज शेगाव येथे बुलढाणा  जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित पदयात्रेत सहभाग घेतला. यावेळी त्यांच्यासोबत आ. राजेश एकडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी आमदार राहुल बोंद्रे  यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, देश स्वतंत्र झाला तेव्हा देशात सुईचेही उत्पादन होत नव्हते. पण पंडित जवाहरलाल नेहरूंच्या दूरद्दष्टी नेतृत्वाखाली भारताने प्रगतीचे एक-एक शिखर गाठले. भारताला जगात राष्ट्र म्हणून उभे केले. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनीही विकासाची कास धरत यशस्वी वाटचाल केली. पी. व्ही. नरसिंह राव, डाॅ. मनमोहन सिंग यांनीही विकासाच्या विविध योजना देशात राबविल्या म्हणून भारत आज एक शक्तीशाली देश म्हणून उभा आहे. इंदिरा व राजीव यांनी  देशासाठी बलिदान दिले आहे. परंतू केंद्रात सत्तेवर असलेले आजचे भाजप सरकार काॅँग्रेस सरकारने उभे केलेले देशाचे वैभव असेल्या सार्वजनिक कंपन्या विकत आहे. अग्निपथसारखी योजना आणून तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले जात आहे. महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. किराणा मालावरही जीएसटी लावून जनतेची लूट केली जात आहे.

चीनची सीमाभागात घुसखोरी
चीन आपल्या सीमाभागात घुसखोरी करत आहे. पण ५६ इंच छातीचे पंतप्रधान त्यावर काही बोलत नाहीत. उलट चीनमधून तिरंगा झेंड्यांची आयात करून त्यांना आर्थिक लाभ कसा पोहचेल याकडे लक्ष दिले जात आहे. भाजपा हा खोटे बोलून सत्तेत आला आहे. त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे. जनतेला दिलेल्या सर्व आश्वासनांचा त्यांना विसर पडला आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून जनजागृती करत भाजपाचा खोटेपणा उघडा पाडण्याचे काम केले जाणार आहे, असे पटोले म्हणाले. विधिमंडळ पक्षनेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात धुळे व जळगाव जिल्ह्यातील आझादी गौरव पदयात्रेत सहभागी झाले. धुळे जिल्ह्यातील क्रांतिभूमी कापडणे येथे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आणि धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील, आ. डॉ. सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर आणि काँग्रेस पदाधिकारी यावेळी सोबत होते.

नाना पटोले आज औरंगाबादेतील पदयात्रेत सहभागी होणार
यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की ‘राष्ट्रालाच देव माना‘ हा विचार सांगणाऱ्या तात्यासाहेब माधवराव दिवाण पाटलांचे कापडणे हे गाव. महात्मा गांधीजींपासून प्रेरणा घेऊन या गावाने स्वतःला स्वातंत्र्यसंग्रामात झोकून दिले. दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, लळींग सत्याग्रह, सविनय कायदेभंग, चिमठाणा खजिना लूट अशा अनेक स्वातंत्र्य मोहिमांमध्ये कापडणे गावच्या नागरिकांचा सक्रिय सहभाग राहिला. १९३६ मध्ये फैजपूर येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनादरम्यान महात्मा गांधीजींच्या सान्निध्यात राहण्याचे भाग्य कापडणे गावच्या अनेक क्रांतिवीरांना मिळाले. त्यामुळेच १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळी मध्ये या गावाने मोठा पुढाकार घेतला. आज या क्रांती भूमिच्या दर्शनाने समाधान मिळाले. त्यावेळी इंग्रजांच्या ताब्यातून देश स्वतंत्र करण्यासाठी लढा दिला. आज लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लढा द्यावा लागत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज ११ ऑगस्ट रोजी औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील पदयात्रेत सहभागी होणार आहेत.

Share