बँक घोटाळाप्रकरणी माजी क्रिकेटपटू नमन ओझाच्या वडिलांना अटक

बैतुल : बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत बनावट खाते उघडून किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सुमारे १.२५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली बँकेचे माजी व्यवस्थापक विनय ओझा यांना मध्य प्रदेशातील मुलताई पोलिसांनी अटक केली आहे. विनय ओझा हे भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू नमन ओझा याचे वडील आहेत.

२०१३ मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या जौलखेडा शाखेत तत्कालीन शाखा व्यवस्थापक अभिषेक रत्नम यांनी किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून बँकेत बनावट खाते उघडून फसवणुकीची योजना आखली होती. रत्नम यांची बदली झाल्यानंतर विनय ओझा (व्ही. के. ओझा) हे जौलखेडा शाखेत शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. विनय ओझा आणि इतरांनी मिळून जून २०१३ मध्ये जवळपास ३४ बनावट खाते उघडून यावर किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) चे कर्ज हस्तांतरित करत जवळपास सव्वा कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. ज्यावेळी ही हेराफेरी झाली, त्यावेळी विनय ओझा हे बँक ऑफ महाराष्ट्रच्या जौलखेडा शाखेचे व्यवस्थापक होते.

२ जून २०१३ रोजी बनावट नावे आणि फोटोंच्या आधारावर बँकेत सुमारे ३४ बनावट खाती उघडण्यात आली आणि या खात्यांच्या मदतीने १.२५ कोटी रुपये काढण्यात आले. बनावट किसान क्रेडिट कार्ड बनवून सव्वाकोटी रुपये किसान क्रेडिट कार्ड कर्ज खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आले. एका खातेधारकाच्या मृत्यूनंतरही त्यांच्या नावे रक्कम घेतल्याची बाब समोर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. यानंतर एक वर्षानंतर बँक ऑफ महाराष्ट्रचे जौलखेडा शाखेचे तत्कालीन शाखा प्रमुख रितेश चतुर्वेदी यांनी विनय ओझा आणि इतरांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार नोंदवली होती. या घोटाळ्यात विनय ओझा यांच्यासह अन्य काही बँक कर्मचाऱ्यांचाही सहभाग होता. याप्रकरणी २०१४ मध्ये मुलताई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर विनय ओझा फरार होते. गेली आठ वर्षे पोलिस त्यांचा तपास करत होते. सोमवारी सायंकाळी मुलताई पोलिसांनी विनय ओझा यांना अटक करून न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील इतर सर्व आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती.

विनय ओझा यांचा मुलगा नमन ओझा हा भारतातील प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत १ कसोटी, १ वनडे आणि २ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने ११३ आयपीएल सामनेही खेळले आहेत. नमनने कसोटीत ५६ धावा, वनडे सामन्यात १ धाव आणि टी-२० मध्ये १२ धावा केल्या आहेत. त्याने ११३ आयपीएल सामन्यांमध्ये फलंदाजी करताना २०.७२ च्या सरासरीने १५५४ धावा केल्या आहेत. नमन ओझाच्या वडिलांना पोलिसानी बँक घोटाळाप्रकरणी अटक केल्याने ओझा कुटुंबाच्या अडचणी वाढल्या आहेत.

Share