नांदेड : राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते डी. पी. सावंत यांच्या घरात दोन बंदूकधारी गुंडांनी घुसून ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना आज सोमवारी दुपारी घडली. या गुंडांनी सावंत यांच्या घरातील नोकराला मारहाण केल्याचे समोर आले आहे. मात्र, या सर्व प्रकरणात डी. पी. सावंत हे सुखरुप आहेत. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत एका आरोपीला अटक केली आहे. अन्य एक आरोपी फरार असून, त्याचा शोध घेतला जात आहे.
डी. पी. सावंत हे काँग्रेसचे माजी मंत्री असून, ते सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय आहेत. डी. पी. सावंत हे नांदेड शहरातील शिवाजीनगर परिसरात राहतात. बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचेही याच भागात निवासस्थान आहे. माजी मंत्री डी. पी. सावंत यांच्या घरात सोमवारी (३० मे) दुपारी दोन बंदूकधारी गुंडांनी घुसखोरी केली. बंदूक घेऊन किचनमध्ये शिरत या गुंडांनी सावंत यांच्या नोकराला मारहाण केली. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सदर गुंड घरात घुसले त्यावेळी सावंत हे घरातच आराम करत होते. घरातील गोंधळ ऐकून डी. पी. सावंत आपल्या खोलीतून बाहेर आले असता, यावेळी गुंडांनी त्यांच्या डोक्याला बंदूक लावून ५० हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याचीही धमकी दिली.
शिवाजीनगर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी तातडीने तपास करीत एका आरोपीला अटक केली आहे. अन्य एक आरोपी फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. डी.पी. सावंत यांच्या घरी दोन बंदूकधारी का शिरले, त्यांचा उद्देश काय होता याबद्दल अधिक माहिती समजू शकली नाही. नांदेड पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत. दिवसाढवळ्या एका माजी मंत्र्याच्या घरात असा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
नांदेडमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी कारवाया वाढल्या असून, कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. काही दिवसांपूर्वी नांदेड शहरात बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आज काँग्रेसचे माजी मंत्री डी. पी. सावंत हे यांच्या घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवून खंडणी मागितल्याचा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.