राज्यातील आगामी निवडणुकीसाठी तयारीला लागा – भुजबळ

नाशिक : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना संदर्भात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सुचक विधान केलं आहे. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला  सामोरे जावे लागणार असल्याचे सूचक विधान केले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकाधिक सदस्य निवडून आणण्याचे आवाहन राष्ट्रवादी काॅँग्रेसचे नेते छगन भुजबळ केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जिल्हा व शहर कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या निमित्ताने आगामी महापालिकेच्या निवडणुकांची चाहुल लागल्याचे संकेत मिळाल्याने छगन भुजबळ निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना पक्षाच्या कार्यकर्त्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्या दृष्टीने तयारी करून आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपालिका बाजार समिती व इतर संस्थांवर जास्तीत- जास्त उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आणण्यासाठी नियोजन करा, असे आवाहन केले. भुजबळ यांनी या वेळी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा घेतला. ते म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवले जात नसतील तर नागरिकांचे हितासाठी आंदोलन उभे करावे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील प्रत्येक विभागात व ग्रामीण भागात तालुकानिहाय एक दिवसीय शिबिराचे आयोजन करावे. पक्षाची सभासद नोंदणी वाढवावी. पदवीधर मतदारसंघासाठी जास्तीत- जास्त मतदार नोंदणी करावी.

समतेचा विचार पोचवा
जाती-धर्माच्या वादात न पडता नागरिकांमध्ये समतेचे विचार पोचवण्याचे काम करावे. देशातील सत्ता मोजक्या धर्मांध लोकांच्या हाती गेली असून हे लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे. विविध संस्थांवर एका विशिष्ट वर्गातील प्रतिनिधी प्रतिनिधित्व करत आहे. या संस्थांवर बहुजन समाजातील प्रतिनिधी निवडून द्यायला हवेत. सिनेट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व समविचारी पक्षाची प्रतिनिधी निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले.

Share