खोटे आरोप करणाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात जाणार, खैरेंना ‘वंचितचा’ इशारा

मुंबई : शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमने लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून एक हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारुख अहमद यांनी खोटे आरोप करणाऱ्यांच्या विरोधात वंचित आघाडी न्यायालयात जाणार आहे. त्यामुळे खैरे यांनी तयार रहावे, असा इशारा फारूख अहमद यांनी दिला आहे.

काय म्हणाले फारुख अहमद

खैरेंना बोलण्याचा स्वातंत्र्य असलं तरीही त्यांनी इतरांवर आरोप करताना विचारपूर्वक बोलावे. जर खैरे यांच्याकडे पैसे दिल्याचे किंवा घेतल्याचे पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावेत. ते सत्तेत आहेत, मुख्यमंत्री त्यांचे आहेत, त्यामुळे सर्व तपास यंत्रणा त्यांच्या हातात असताना असे बिनबुडाचे आरोप खैरे करत आहे. यापूर्वी सुद्धा शिवसेनेच्या नेत्याने असेच आरोप केले होते, पुढे त्याला माफी मागत फिरावे लागलं.

खैरेंनी हवेत बोलू नये. बोलण्याचे स्वातंत्र्य असले तरी दुसर्‍यांवर आरोप करताना विचार पूर्वक बोलले पाहीजे, आरोप करताना पुरावे देणेही आवश्यक असते. भाजपच्या कुठल्या नेत्याने आणि कुठे पैसे दिले त्याचे पुरावे द्या. वंचित बहुजन आघाडीचे चारित्र्य स्वच्छ आहे. खोटे आणि निराधार आरोप करणाऱ्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी कोर्टात गेल्या शिवाय रहाणार नाही. पुराव्या शिवाय आरोप करणारांनी डीफेमेशनच्या केसला तयार रहावे. भ्रष्टाचाराच्या आरोपातून हे स्वतःच्याच नेत्यांना वाचवू शकत नाहीत, यांच्या नेत्यांवर धाडी टाकल्या जात आहेत. खरे तर तुमची ही धडपड तुमच्या नेत्यांना वाचवण्या साठी आहे. त्या विषयावर कोर्टात गेलो तर तुमच्या नेत्यांना कोणी वाचवू शकणार नाही हे लक्षात ठेवा. असही त्यांनी म्हटंल आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत खैरे

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमने लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून एक हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. तुम्ही किती कमवले, कुठून आले एवढे पैसे तुमच्याकडे. लोकसभा निवडणुकीत एक हजार कोटी रुपये वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला भाजपने दिले होते. उत्तर प्रदेशमध्ये आता निवडणूक झाली. त्याठिकाणी समाजवादी पार्टीच्या लोकांना फोडण्यासाठी कशाला पैसे दिले. तुम्ही हे सर्व धंदे करतात, आले कुठून हे पैसे असा आरोप खैरे यांनी यावेळी केला आहे.

Share