स्वातंत्र्यवीर सावरकर हा सूर्य कधी मावळला नाही, तो कधी मावळणारही नाही

पुणे : स्वातंत्र्यानंतर सुमारे ५० वर्षांहून अधिक काळ काँग्रेसची ‘गल्ली ते दिल्ली’ सत्ता होती. या काळात शक्य त्या मार्गाने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला; परंतु स्वातंत्र्यवीर सावरकर हा सूर्य कधी मावळला नाही, तो कधी मावळणारही नाही, असे मत प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. अहिंसेने रक्षण करता येत नाही. त्यासाठी शस्त्रच हाती घ्यावे लागते, असेही ते म्हणाले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त स्वा. सावरकर जयंती समितीतर्फे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन’ या विषयावर शनिवारी अभिनेते शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे, विवेक जोशी, प्रकाशक पार्थ बावस्कर, समितीचे सूर्यकांत पाठक, विद्याधर नारगोळकर, विश्वनाथ भालेराव, मकरंद माणकीकर, श्रीकांत जोशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. शब्दांमृत प्रकाशनतर्फे शरद पोंक्षे यांच्या ‘दुसरं वादळ’ या पुस्तकाचे प्रकाशनदेखील यावेळी करण्यात आले.

शरद पोंक्षे यावेळी म्हणाले, स्वातंत्र्यानंतरही सरकारने सावरकरांचा अपमानच केला. सावकरांना टिळकांची काँग्रेस मान्य होती. गांधींची नव्हती. हिंदी राष्ट्रवाद, मुस्लिमांचे पराकोटीचे लांगुलचालन यामुळे मी काँग्रेसमध्ये कधीच येऊ शकत नाही, हे सावकरांनी स्पष्ट केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला गांधीवादी म्हणत असले, तरी ते मूळ सावरकरवादी आहेत. राजकीयदृष्ट्या योग्य भूमिका स्वीकारणे त्यांना जमते. इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदी असताना सावरकरांचा गौरव केला होता. हा इतिहास इंदिरा गांधींच्या नातवाला माहिती नाही, असे पोंक्षे म्हणाले.

राम जिंकणार, रावण हरणार
‘अंदमानातून सुटल्यानंतर स्वा. सावरकरांनी समाजसुधारक म्हणून मोठे कार्य उभारले. त्यांनी सर्व जातींमधील मुलांच्या मुंजी लावल्या. आंतरजातीय विवाह घडवून आणले. सहभोजने घातली. मंदिरे खुली केली. सावरकरांच्या विरोधकांवर जातीद्वेष, जातीभेदाचेच संस्कार होते. आमच्यावर सावरकरांचे संस्कार आहेत. राम जिंकणार, रावण हरणार, यावर माझा ठाम विश्वास आहे, असेही पोंक्षे म्हणाले.

…तरच आपण येणाऱ्या संकटाला तोंड देऊ शकू -विक्रम गोखले

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे केवळ पुतळे उभारून चालणार नाही, तर त्यांचा विज्ञानविचार आपण स्वीकारायला हवा, असे सांगून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले म्हणाले, आपला देश सध्या अडचणीच्या ठिकाणी उभा असून, भविष्यात काही संकटेही येणार आहेत. त्यामुळे सर्व तरुण- तरुणी सशस्त्र झाले, तरच आपण येणाऱ्या संकटाला तोंड देऊ शकू. ही मागणी मी पंतप्रधान कार्यालयापर्यंत केली आहे.

याप्रसंगी दिग्दर्शक प्रवीण तरडे, सूर्यकांत पाठक यांनीही मनोगत व्यक्त केले. अभिनेत्री राधिका देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

Share