राज्यपालांविरोधात आज पिंपरी चिंचवड बंद

पुणेः राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्याविरोधात आज पिंपरी चिंचवड बंद पुकारण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महाराष्ट्रातील महापुरुषांचा राज्यपालांकडून वारंवार अवमान होत असल्याचा आरोप करत अनेक संस्था, संघटना तसेच राजकीय पक्षांनी हा बंद पुकारला आहे.

छत्रपती शिवाजी महारांबाबत भगतसिंह कोशारींनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राज्यभरात वातावरण पेटलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. राज्यपालांना हटवा, अशी मागणी करण्यात आली मात्र अजूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही आहे. त्यामुळे भाजपविरोधात देखील सगळे पक्ष आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी बंदला पाठिंबा दर्शवला आहे. दुपारी साडे बारा वाजता ते या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. ते ज्या मंचावरुन संबोधित करणार आहेत, तो मंच सज्ज झाल आहे. संभाजीराजे या मंचावरुन काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असून या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Share