सर्वसामान्यांना मोठा दिलासा! एलपीजी गॅसच्या दरात मोठी घट, जाणून घ्या नवे दर

नवी दिल्ली : सप्टेंबर महिन्याची सुरुवात होताच गॅस वितरण कंपन्यांनी ग्राहकांना दिलासा दिला आहे. कंपन्यांकडून गुरुवार, १ सप्टेंबर २०२२ रोजी एलपीजी सिलिंडरच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. मात्र, ही कपात केवळ व्यावसायिक गॅस सिलिंडरवर आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वेबसाइटनुसार, आज व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये १०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून राजधानी दिल्लीत १९ किलोच्या सिलेंडरची किंमत १,८८५ रुपये होणार आहे. हे नवे दर आज सकाळी ६ पासून लागू झाले आहेत.

सलग ५ व्यांदा व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत घट झाली आहे. मे महिन्यात विक्रमी २३५४ रुपयांवर पोहोचलेला १९ किलोचा सिलेंडर आता दिल्लीत 1885 रुपयांवर आला आहे. राजधानी दिल्लीत आता यासाठी १९७६.५० ऐवजी १८८५ रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच कोलकात्यात २०९५.५० ऐवजी १९९५.५० रुपये, मुंबईत १९३६.५० ऐवजी १८४४ रुपये आणि चेन्नईमध्ये २१४१ ऐवजी २०४५ रुपये मोजावे लागतील.

घरगुती एलपीजी गॅसच्या दरात कोणताच बदल नाही
घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल नाही. घरगुती वापरासाठी असलेल्या एलपीजी गॅसच्या दरात ६ जुलैपासून कोणताही बदल झाला नाही. जुलै महिन्यात ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. मुंबईत घरगुती वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडरसाठी १०५२.५० रुपये मोजावे लागत आहेत. राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरसाठी १०५३ रुपये, कोलकातामध्ये १०७९ रुपये आणि चेन्नईत १०६८.५० रुपये मोजावे लागत आहेत.

व्यावसायिक एलीपीजी ग्राहकांना दिलासा
गॅस कंपन्यांकडून दर महिन्याच्या एक तारखेला एलपीजी गॅसचे दर जाहीर केले जातात. काही वेळेस महिन्याच्या मध्यावरदेखील नवीन दर जाहीर होतात. ऑगस्ट महिन्यातदेखील व्यावसायिक एलपीजी गॅसच्या दरात ३६ रुपयांची कपात झाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा ५० रुपयांनी दर कपात करण्यात आली आहे.

Share