गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला – जयंत पाटील

 मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना राजकीय सभा घेण्यातून वेळ मिळत नसल्याने पुन्हा एकदा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काॅंग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

जयंत पाटील म्हणाले की, वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत सुमारे २० बिलियन डॉलर्स म्हणजेच एक लाख अठ्ठावन्न हजार कोटी इतकी भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेलेला आहे. सुमारे एक लाख इतकी रोजगारक्षमता असलेला प्रकल्प महाराष्ट्राने गमावला आहे. महाविकास आघाडीने या गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केला होता. या कंपनीच्या शिष्टमंडळाने नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना राजकीय सभा घेण्यातून वेळ मिळत नसल्याने पुन्हा एकदा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, गुजरातच्या निवडणूक तोंडावर आल्याने महाराष्ट्रातील भाजपा गुजरातचे हित जपण्यात व्यस्त दिसते. महाराष्ट्रातील तरुणांचा हक्काचा रोजगार गमावल्याबद्दल राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माफी मागतील का?, अशी विचारणा पाटील यांनी केली आहे.

Share