औरंगाबादच्या नामांतराविरोधात रस्त्यावर आणि न्यायालयात लढा देणार

औरंगाबाद : ठाकरे सरकारने औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करण्याचा निर्णय घेतला. आता या नामांतरावरून औरंगाबादचे राजकारण तापण्याची चिन्हे असून, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील नामांतरावरून आक्रमक झाले आहेत. औरंगाबादचे कधीच ‘संभाजीनगर’ होऊ देणार नाही. याविरोधात रस्त्यावर आणि न्यायालयातही लढाई लढणार, ‘संभाजीनगर’ नामकरणाच्या विरोधात आम्ही सर्व जाती-धर्मीय शहरवासीयांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत दहा मोठे निर्णय घेण्यात आले होते. यामध्ये ठाकरे सरकारने औरंगाबादचे नाव ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. ज्या दिवशी कॅबिनेटमध्ये औरंगाबादचे नाव ‘संभाजीनगर’ करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. त्याच दिवशी औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामकरणाला विरोध दर्शवत जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला होता. खा. इम्तियाज जलील यांनी ‘संभाजीनगर’ नामकरणाच्या विरोधात विविध पक्ष, संघटना, आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मंगळवारी (५ जुलै) सुभेदारी विश्रामगृह येथे बैठक बोलावली होती. या बैठकीत ‘संभाजीनगर’ नामकरणाला कशा पद्धतीने विरोध करायचा याबाबत उपस्थितांनी मते मांडली. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यासाठी सर्वपक्षीय समिती स्थापन करण्याचेही यावेळी ठरले.

यावेळी खा. इम्तियाज जलील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मविआ महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांवरील प्रेमापोटी नव्हे तर सत्ता जात असल्याने व दुसऱ्या पक्षाला श्रेय मिळू नये यासाठी शिवसेनेने औरंगाबादचे नामांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय संभाजी महाराज यांच्या प्रेमापोटी घेतला नसून सत्ता जात असल्याचे पाहून घेतला आहे. येत्या काळात या निर्णयाविरोधात सर्व जाती-धर्मातील लोकांना विश्वासात घेऊन रस्त्यावरची व न्यायालयीन लढाई लढणार आहे. तसेच नामांतराविरुद्ध लोकसभेत आवाज उठवेन, अशी माहिती खा. जलील यांनी दिली.

आम्ही सर्वजण छत्रपती संभाजी महाराजांचा आदर करतो. मात्र, सत्तेत बसलेल्या पक्षाच्या एका नेत्याने २५ ते ३० वर्षांपूर्वी औरंगाबादमध्ये येऊन नामांतराची इच्छा व्यक्त केली होती. केवळ त्या नेत्याच्या इच्छेखातर आपण नामांतराचा अन्याय सहन का करायचा, असा सवाल खाजलील यांनी बैठकीत उपस्थित केला. कुणाच्या आजोबा, पणजोबाची इच्छा म्हणून औरंगाबादचे नाव बदलू देणार नाही. संभाजी महाराजांचा आम्ही आदर करतो; परंतु त्यांच्या नावाचा उपयोग करून द्वेषाचे राजकारण करू देणार नाही. औरंगाबादची ऐतिहासिक, सांस्कृतिक व पर्यटन केंद्राची ओळख मावळत्या ठाकरे सरकारने पुसली. त्याचा आम्ही विरोध करतो. औरंगाबादच्या नामांतराच्या वेळी आपण शांत राहिलो तर येण्यारी पिढी आपल्याला नक्कीच विचारेल की, जेव्हा या शहराचे नामांतर होत होते, तेव्हा तुम्ही काय करत होता. त्यामुळे नामांतराला विरोध व्हायलाच हवा. माझा जन्म औरंगाबादमध्ये झाला असून मला मृत्यूदेखील औरंगाबादमध्येच यायला हवा. माझ्या जन्म प्रमाणपत्रावर ‘औरंगाबाद’ लिहिले आहे, तर मृत्यू प्रमाणपत्रावरही ‘औरंगाबाद’ च असायला हवे, असेही खा. जलील यांनी म्हटले.

यावेळी इतिहासाचे अभ्यासक रमजान शेख, एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफार कादरी, जनता दलाचे अजमल खान, काँग्रेसचे डॉ. पवन डोंगरे, वंचित बहुजन आघाडीचे प्रभाकर बकले, योगेश बन, रिपाइं आठवले गटाचे शहराध्यक्ष, माजी उपमहापौर किशोर थोरात आदींची उपस्थिती होती. माजी नगरसेवक गौतम खरात, किशोर थोरात, इलियास किरमाणी, अफसर खान, मोहसीन अहमद, माजी महापौर रशीदमामू, अश्फाक सलामी, फेरोज खान, वंचित बहुजन आघाडीचे योगेश बन, महेंद्र सोनवणे, खिजर पटेल, तृप्ती डिग्गीकर आदींनी भूमिका मांडली.

काँग्रेसचे डॉ. पवन डोंगरे यांनी सांगितले की, औरंगाबाद शहराला ३५० वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे. प्रत्येक शहरवासीयाचे औरंगाबाद या नावाशी नाते जोडलेले आहे. म्हणून ‘संभाजीनगर’ नामकरण करण्याच्या निर्णयाविरुद्ध कायदेशीर लढाई लढावी लागेल. माजी उपमहापौर किशोर थोरात म्हणाले, लोकांच्या भावना जाणून न घेता केलेल्या नामांतराला आमचा विरोध आहे. ही औरंगाबादकरांच्या अस्मितेची लढाई आहे. कम्युनिस्ट नेते अश्फाक सलामी यांनी सांगितले की, कोण किती मोठा हिंदुत्ववादी आहे, हे दाखवण्याच्या स्पर्धेतून नामांतराचा खेळ खेळला जात आहे.

Share