वर्धा- दोन वर्षापूर्वी वर्ध्यातील हिंगणघाट येथे एका महिला प्राचार्याला एकतर्फी प्रेम प्रकरणातून भररस्त्यात पेटवून देणारी धक्कादायक घटना घडली होती. यावर न्यायालयाच्या ६५ सुनावण्या पार पडत आरोपीला आज जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी माहिती ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांनी दिली.
काल आरोपीला ११.३० वाजता चोख पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी सरकारी पक्षाचे वकील ॲड उज्वल निकम, आरोपी पक्षाचे वकील ॲड भूपेंद्र सोने न्यायालयात हजर झाले. याचसोबत पीडितेचे आई-वडीलदेखील न्यायालयात दाखल झाले होते. याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आरोप सिद्ध झाले असून या जळीतकांड प्रकरणात आरोपी दोषी ठरविण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
३ फेब्रुवारी २०२० रोजी आरोपी विकेश नगराळेनं एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवलं होतं. १० फेब्रुवारीला तिचा मृत्यृ झाला. या घटनेनंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सर्वांकडून केली जात होती. पोलिसांकडून याप्रकरणी ४२६ पानांच दोषारोपपत्र, ६४ सुनावणी आणि २९ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. पीडित तरुणीच्या मृत्यूला दोन वर्ष पूर्ण होत असून तिच्या स्मृतीदिनीच कोर्टने शिक्षेची सुनावणी केली आहे.
काय घडलं हिंगणघाटमध्ये?
हिंगणघाटच्या श्रीमती कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतिशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक असलेली पीडिता ३ फेब्रुवारीला सकाळी आपल्या घरातून बसने हिंगणघाटला आली. आरोपी विकेश नगराळे तिच्या नेहमीच्या मार्गावर दबा धरून बसला होता. ती दिसताच त्याने दुचाकीतील पेट्रोल काढून तिच्यावर ओतले आणि जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात ही तरुणी ४० टक्के होरपळली. नागपूमधील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर १० फेब्रुवारी रोजी तिची प्राणज्योत मालवली.
कोण आहे आरोपी?
आरोपीचे नाव विकेश नगराळे असं आहे. आरोपीचे लग्न झाले असून त्याला मुलगी आहे. नुकताच तो रेल्वेत नोकरीला लागल्याचं सांगण्यात आलं होतं. याआधी तिचा जुळलेला विवाह तुटल्याने पीडितेच्या वडिलांनी आरोपीला खडसावलं होतं.