गृह, वाहन कर्ज महागणार; रेपो दर वाढला

नवी दिल्ली : देशातील महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे. या वाढत्या माहागाईचा फटका आता देशातील कर्जदारांना देखील बसला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता रेपो दर ४% वरुन वाढवून ४.४०% करण्यात आला आहे. म्हणजेच तुमचा ईएमआय आणि कर्ज महागणार आहे.

२ आणि ३ मे रोजी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तातडीची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पतधोरण आढावा बैठक दर दोन महिन्यांनी घेतली जाते. या आर्थिक वर्षाची पहिली बैठक गेल्या महिन्यात ६-८ एप्रिल रोजी झाली होती. पुढील बैठक जूनमध्ये होणार होती. पतधोरण आढावा बैठक वास्तविक दर दोन महिन्यांनी होते. या आधी ६ ते ८ एप्रिल रोजी बैठक झाली होती. तर या आधी 22 मे 2020 रोजी रेपो दरात बदल करण्यात आला होता. तेव्हापासून रेपो दर ४% या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर आहेत. मात्र, आता रेपो दरात वाढ करण्यात आली आहे.

रेपो दर म्हणजे काय?

ज्या दराने बँकांना आरबीआयच्या वतीने कर्ज दिले जाते, त्याला रेपो दर असे म्हटले जाते. तर बँकांनी त्यांच्याकडील पैसे आरबीआयकडे ठेवले तर त्या बँकांना रिझर्व्ह बँक जे व्याज देते त्याला रिव्हर्स रेपो दर असे म्हटले जाते.

Share