इस्लामाबाद : पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात आज (बुधवार) सकाळी भीषण अपघात घडला. बलुचिस्तानमध्ये एक प्रवासी वाहतूक करणारी बस १०० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत २२ जण ठार झाले, तर १ बालक गंभीर जखमी झाला आहे. आज सकाळी घटना घडली आहे. या बसमधून २३ जण प्रवास करत होते. ही बस अतिवेगात जात होती. त्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’ च्या वृत्तानुसार, बुधवारी सकाळी ही बस २३ प्रवाशांना घेऊन लोरलाईहून झोबकडे निघाली होती. झोब राष्ट्रीय महामार्गावरील सैफुल्लाह किल्ल्याजवळील अख्तरजई परिसरात असलेल्या १०० फूट खोल दरीत ही बस कोसळली. यामध्ये बसमधील २२ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये ५ मुले, ५ महिला आणि ११ पुरुषांचा समावेश आहे. दरीतून २२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेत एक मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याला क्वेट्टा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील सर्व मृत प्रवाशांचे मृतदेह किल्ला सैफुल्ला जिल्हा मुख्यालयी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती झोबचे जिल्हा उपआयुक्त हाफिज मोहम्मद कासीम यांनी दिली.
22 killed in Balochistan as passenger van plunges into ravine
Read @ANI Story | https://t.co/Algw1w7BVk#Balochistan #accident pic.twitter.com/ckl852aXo8
— ANI Digital (@ani_digital) June 8, 2022
या भीषण अपघाताबद्दल पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो-झरदारी यांनी शोक व्यक्त केला आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. बलुचिस्तानमध्ये बस दरीत कोसळण्याचे प्राथमिक कारण अतिवेग असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.