स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कोठडीचा इतिहास जाणून शहारून गेलो – अमित ठाकरे

रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी संघटनेच्या बैठका आणि कामांनिमित्त सध्या कोकण दौऱ्यावर असणाऱ्या अमित ठाकरेंनी आज रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना डांबून ठेवण्यात आलं होतं त्या कोठडीला भेट दिली. यासंदर्भातील माहिती अमित ठाकरेंनी एका खास पोस्ट शेअर करत दिली आहे.

अमित ठाकरे आपल्या पोस्ट मध्ये म्हणतात, रत्नागिरी शासकीय विश्रामगृहात भेटायला आलेले वरिष्ठ पोलीस अधिकारीअमेय पोतदार यांच्या आग्रहास्तव रत्नागिरी विशेष कारागृहात गेलो. तिथल्या सावरकर स्मृती कक्षात गेल्यानंतर, त्या कोठडीचा इतिहास जाणून घेतल्यानंतर शहारून गेलो, असं अमित ठाकरे यांनी म्हणाले.

अंदमानला काळया पाण्याची शिक्षा भोगल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी १९२१ ते १९२३ अशी दोन वर्षं ज्या तुरुंगाच्या अंधाऱ्या खोलीत दंडा-बेडी लावून डांबून ठेवलं होतं, त्याच जागी काही मिनिटं मी उभा होतो.

कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्यांनी या कारागृहातल्या सावरकर स्मृती कक्षाला भेट द्यायलाच हवी. इथे आपला इतिहास आहे. जुलुमाविरोधात लढण्याचं महाप्रचंड बळ देणारी प्रेरणा इथे आहे. त्या प्रेरणेचं नाव – स्वातंत्र्यवीर सावरकर, असं अमित ठाकरेंनी म्हटलंय.

Share