राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, पुढील तीन दिवस धोक्याचे

मुंबई : हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे दि. १० जुलैपर्यंत अतिवृष्टी तर कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (६४ ते २०० मिमी) पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरु आहे. मंत्रालय नियंत्रण कक्ष सतर्क असून राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या संपर्कात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याकारणाने मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता ९ जुलैपर्यंत बंद कण्यात आला आहे. व वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे, अशी माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

काेकण विभागातील पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १३८ मिमी. पाऊस झाला असून, जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असल्याने आणि भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. पालघर जिल्हा प्रशासन सतर्क असून मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या संपर्कात आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एनडीआरएफची टीम तैनात आहे.

ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ९५.७ मिमी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. जिल्ह्यात सर्व प्रकारची वाहतूक सुरुळीत सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एनडीआरएफची  टीम तैनात आहेत.

मुंबईत गेल्या २४ तासात मुंबई कुलाबा येथे ११०.६ मिमी तर सांताक्रूझ येथे १२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र अद्याप सर्व प्रकारची वाहतूक सुरळीत असल्याबाबत मुंबई महानगरपालिका नियंत्रण कक्षाने कळविले आहे. मध्य रेल्वे वरील वाहतूक धीम्या गतीने सुरु असून पश्चिम रेल्वे मार्ग सुरळीत आहे. मुंबई मध्ये एनडीआरएफ च्या तीन टीम या आधीच तैनात आहेत मात्र खबरदारीचा उपाय म्हणून दोन अतिरिक्त टीम अशा एकूण पाच टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १०६ मिमी. पाऊस झाला आहे जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच सावित्री, कुंडलिका तसेच इतर मोठ्या नद्या धोका पातळीच्या खाली वाहत आहेत. पोलादपूर, महाड व माणगाव येथील दरड प्रवण व पूर प्रवण भागातील ११५ कुटुंब म्हणजे एकूण २८९ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १४ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे तसेच ३ घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

 

 

 

 

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात १७३.४ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही. मात्र जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी व राजापूर तालुक्यातील कोदवली नदी इशारा पातळी वरून वाहत आहेत. या भागातील नागरिकांचे आवश्यकतेनुसार स्थलांतर करण्यात येत असून नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून जिल्हा प्रशासन सतर्क आहे. तसेच वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता ०९ जुलै २०२२ रोजी पर्यंत बंद करण्यात आला आहे व वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. कराड – चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाट येथे दरड कोसळली असून एकेरी वाहतूक सुरु आहे. दरड प्रवण व पूर प्रवण भागातील १३६ कुटुंब म्हणजे एकूण ४७७ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४० घरांचे अंशतः नुकसान झाले आहे तसेच २ घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात २ एनडीआरफ टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासात ५०.२ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरुळीत सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात 1 एनडीआरफ टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातील परिथिती सामान्य असून जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत असून सर्व प्रकारची वाहतूक सुरळीत सुरु आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी २३.९ मिमी. पाऊस झाला असून, सद्यस्थिती मध्ये पूर परिस्थिती नाही मात्र पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या २४ तासात ३ फुटांनी वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची सध्याची पाणी पातळी ३२.५ फुट असून इशारा पातळी ३९ फुट एवढी आहे. नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने झालेली वाढ आणि पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता एनडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच नदी काठावरील लोकांना सातत्याने सतर्कतेच्या सूचना देण्यात येत असून स्थानिक शोध व बचाव पथके तैनात करण्यात आली आहे.

राज्यातील पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या पूर प्रवण जिल्ह्यांमध्ये या आधीच १५ तुकड्या तैनात केल्या आहेत.

राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात

मुंबई (कांजूरमार्ग १ घाटकोपर १) -२, पालघर -१, रायगड- महाड- २, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण -२, कोल्हापूर-२, सातारा-१, सिंधुदुर्ग-१ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १३ टीम तैनात आहेत. तर नांदेड-१,गडचिरोली-१ अशा एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या कायमस्वरूपी ९ तुकड्या

मुंबई -३, पुणे-१, नागपूर-१ अशा एकूण ५ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), तसेच धुळे-२, नागपूर-२ अशा एकूण ४ टीम राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या कायमस्वरूपी तुकड्या आहेत.

Share