औरंगाबादमध्ये घरघुती वादातून पत्नीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून

औरंगाबाद : घरघुती वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना काल दि.२७ रोजी सकाळी औरंगाबादमधील बायजीपुरा गल्ली.नं.21 मध्ये घडली आहे. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात आरोपी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख खलील शेख इस्माईल असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी खलील शेख

याविषयी पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,  शहरातील बायजीपुरा गल्ली.नं.21 मध्ये वास्तव्यास असलेले शेख खलील आणि पत्नी अंजुम खलील शेख हे त्यांच्या दोन मुलांसोबत याठिकाणी राहत होते. काल सकाळी पती-पत्नीमध्ये घरघुती कारणावरुन कडाक्याचे भांडण झाले. यावेळी राग अनावर झाल्याने खलील शेख याने बाहेरून मोठा दगड आणून पत्नी अंजुमच्या डोक्यात जोरदार वार केले. यात तिचा मृत्यु झाला.  धक्कादायक बाब म्हणजे हा खून झाला तेव्हा त्यांचा लहाना मुलगा देखील तिथेच उपस्थित होता. खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला. मुलाने आरडाओरड केल्यानंतर शेजाऱ्यांनी अंजुमला घाटी रुग्णालयात नेले परंतू तोपर्य़ंत तिचा मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरोपीच्या शोधात एक पथक पाठवून तात्काळ आरोपीला अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश मयेकर करीत आहे.

Share