मराठवाड्यात उन्हाचा पारा ४१ अंशावर; ‘या’ जिल्ह्यात पहिला बळी

औरंगाबाद : मराठवाड्यात उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यात पारा वाढला आहे.  औरंगाबादसह जालना, परभणी, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद, हिंगोली जिल्ह्यातील तापमान चाळीशीपर्यंत किंवा चाळीशीपार पोहोचले आहे. तसेच पुढील तीन दिवस उन्हाचा तडाखा कायम राहून काही अंशी तापमानात वाढ संभवू शकते, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

उष्माघाताने पहिला बळी

उस्मानाबाद जिल्ह्यात उष्माघातामुळे या वर्षातील पहिला बळी गेल्याची घटना घडली आहे. काल जिल्ह्यातील लिंबराज सुकाळे या 50 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेतातील कडबा बांधून झाल्यावर तहान लागल्याने त्याने घाई-घाईत पाणी प्यायले. त्यानंतर त्याला उष्माघाताचा झटका आला. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना तत्काळ उपचारासाठी कळंब येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले. येत्या तीन दिवसात मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम असल्याने शेतकरी आणि अन्य नागरिकांनी थेट उन्हात जाणे टाळावे, तसेच आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share