गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज्य सरकारची सकारात्मक घोषणा

मुंबईः राज्यात मागील दोन वर्षांपासून कोरोना संक्रमण काळात अनेक निर्बंध लावण्यात आले होते. राज्य सरकारच्या  कालच्या  मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान या निर्बंधांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री  राजेश टोपे यांनी माध्यमांना दिली. राज्यातील कोरोना काळातील निर्बंध गुढीपाडवा सणापासून पूर्णपणे हटवण्यात येणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. निर्बंध हटवण्यात आले असले तरीदेखील काळजी घेतलीच पाहीजे, असे आवाहनही टोपे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. .

लोकांनी स्वत:ची आणि सार्वजनिक ठिकाणी इतर लोकांची काळजी घेणे हे महत्त्वाचे आहे. यासाठी मास्क घालणे हे ऐच्छिक असले तरी आवश्यक असल्याचे टोपे यांनी सांगितले.त्यामुळे गुढीपाडवा तसेच त्यावेळी निघणाऱ्या शोभायात्रा आपल्याला अत्यंत उत्साहाने साजऱ्या करता येतील. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यासोबतच येणारे इतर सण पूर्ण उत्साहाने साजरे करता येतील, अशी बाब त्यांनी मांडली. जगात अनेक देशांमध्ये मास्क मुक्ती करण्यात आली आहे. परंतु मुख्यंमत्री यांनी केंद्र सरकार, टास्क फोर्सशी केलेल्या चर्चेअंती हा निर्णय घेतला असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

तसेच आरोग्य विभागातील ४० ते ५० वयोगटातील शासकीय कर्मचाऱ्यांना दोन वर्षात एकदा पाच हजार रूपयांच्या मर्यादेपर्यंत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आवश्यक चाचण्या करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ५० ते ६० वयोगटातील कर्मचाऱ्यांना दरवर्षी या चाचण्या करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी १०५ कोटी रुपयांचा निधी मान्य करण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

महाराष्ट्रात आजपासून काय बदलले?
– १ एप्रिलपासून महाराष्ट्रात कोरोनाचे सर्व निर्बंध हटविण्यात आले आहे.
– मार्च २०२० ते ३१ मार्च २०२२ जवळपास दोन वर्षे लागू असलेले कोरोनाचे निर्बंध संपुष्टात आले आहेत
– गुढीपाडवा शोभायात्रा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान उत्साह साजरा करता येणार
– केंद्राच्या निर्णयानुसार मास्कसक्ती आणि सोशल डिस्टन्सिंग कायम असेल
– मात्र महाराष्ट्राच्या निर्णयानुसार मास्कसक्ती नसेल, मास्क लावणे ऐच्छिक असेल
– हॉटेल, उद्याने, जीम, सिनेमागृह, शैक्षणिक संस्थामधील उपस्थिवर मर्यादा नाही
– लग्न किंवा कौटुंबीक कार्यक्रम, सोहळे, अंत्ययात्रांमधील उपस्थितींवर मर्यादा नाही.
– बस, लोकल आणि रेल्वेने प्रवास करताना लशीचं प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही.
– सार्वजनिक ठिकाणं, मॉल, बगिचे याठिकाणी मास्क वापरणे किंवा लशीचं प्रमाणपत्र धाखवण्याची गरज भासणार नाही.
– महारष्ट्रभरात सर्वधर्मीयांचे सर्व उत्सव निर्बंधमुक्त असतील, यात्रा-जत्रा धुमधडाक्यात होणार
– निर्बंधामुळे उद्योग आणि व्यवसायांवर आलेली बंधनं हटली आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळेल.

Share