नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभांचा निकाल आज जाहीर होत आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांतील नागरिकांचा मतकौल आज स्पष्ट होईल. सकाळी आठपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर होतील. अशात आता एक मोठी बातमी समोर आली आहे.पंजाब, गोवा, उत्तराखंडचे राज्यातील मुख्यमंत्री असलेले आणि मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेले नेते देखील पिछाडीवर असल्याचं समोर आले आहे.
पंजाब मध्ये आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
काॅंग्रेसचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी हे सध्या दोन्ही जागांवरुन पिछाडीवर आहेत. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे देखील पिछाडीवर आहेत. इतकंच नाही तर काँग्रेसचे दिग्गज नेते नवज्योत सिंग सिंद्धू हे देखील पिछाडीवर आहेत.
गोव्याचे मुख्यमंत्री पिछाडीवर
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सध्या पिछाडीवर आहेत. सध्या गोव्यात भाजपची सत्ता आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर भाजपने प्रमोद सावंत यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना मुख्यमंत्री बनवलं होतं. भाजपने राज्यात त्यांच्याच नेतृत्वात निवडणुका लढवल्या. गोव्यात सध्या भाजपला बहुमत मिळताना दिसत असलं तर अजून पूर्ण निकाल येणं बाकी आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पिछाडीवर
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी हे देखील सध्या पिछाडीवर आहेत. उत्तराखंडमध्ये भाजप बहुमताकडे वाटचाल करत असली तरी मुख्यमंत्री पिछाडीवर आहेत. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत देखील पिछाडीवर आहेत.