राज्यात जादूटोण्याच्या माध्यमातून मुलींवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ- रुपाली चाकणकर

मुंबई : महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवासांपासून महिलांवर तसेच मुलींवर जादूटोण्याच्या माध्यामातून अत्याचार केल्याच्या घटना घडत आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग हा सतर्क झाला असून या घटनांची गंभीर घेतली आहे अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

रुपाली चाकणकर म्हणाल्या की, काही दिवसांपूर्वी मुलीच्या शरीरात दुष्ट आत्म्याने प्रवेश केला आहे असे मांत्रिकाने सांगितले, तसेच तिला जीवे मारण्याचा देखील सल्ला दिला. यावरुन आपल्या पोटच्या सहा वर्षीय मुलीची हत्या केली. तसेच औरंगाबाद येथे एक भोंदूबाबा डोक्यावर हात ठेऊन आजार बरे करत असल्याची बतावणी करत होता हादेखील प्रकार उघडकीस आला आहे. त्याचप्रमाणे पुण्यामध्ये पुत्रप्राप्तीसाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरून एका महिलेस तिच्या पती, सासू आणि सासऱ्याने सर्वांसमक्ष अंघोळ करायला लावल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी या पीडितेच्या पती, सासू, सासरे यांना अटक झाली होती आणि आज फरार असलेल्या मांत्रिकाला देखील अटक करण्यात आलेली आहे.

या सर्व घटना या महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत आणि पुरोगामी राज्याची मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत. यावर महाराष्ट्र राज्य महिला आयोग योग्य ती कारवाई करेलच परंतु या सर्व घटना का घडत आहेत याचा विचार करणे गरजेचे आहे असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. महिलांवरील अत्याचाराचे मूळ हे समाजात असलेली अंधश्रद्धा आहे असं म्हणत हे कारण समूळ नष्ट करणे ही तुमची, आमची आणि सर्वांचीच प्रमुख जबाबदारी आहे असंही चाकणकर म्हणाल्या आहेत.

या बाबतीत महाराष्ट्र राज्य महिला आयोग गांभीर्यपूर्वक विचार करत असून अशा अंधश्रद्धेमुळे महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी व्हावे आणि समाजातील अशा मानसिकतेत बदल घडविण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने ह्याची गंभीर दखल घेतली आहे अशी माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अंधश्रद्धेबद्दल जनजागृती करण्याचे आवाहन रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

Share