मोदी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे निष्पाप नागरिकांचे प्राण गेले

मुंबईः चुनावजीवी राज्यकर्त्यांच्या दिरंगाईमुळे हजारो विद्यार्थी मायदेशी परतण्याच्या प्रतिक्षेत जागतिक पातळीवर रशिया आणि युक्रेनच्या सीमारेषेवर युद्धाचे ढग जमायला लागल्यानंतर युक्रेनमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी जगातील सर्व देश प्रयत्न करत होते. त्यावेळी आपले केंद्र सरकारमधील नेते पाच राज्यातील निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त राहिले. प्रत्यक्ष युद्धाला तोंड फुटल्यानंतरही युक्रेनमध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यास कुचराई केली गेली. एका विमानातून केवळ २५० विद्यार्थी आणत असताना मोदी सरकारच्या मंत्र्यांनी त्यांच्यासमोरही भाषण ठोकण्याची संधी गमावली नाही. परिणामतः काल युक्रेनच्या खार्कीव्ह येथे एका भारतीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी येऊन ठेपली आहे.

मोदी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे आजवर अनेक निष्पाप नागरिकांचे प्राण गेले आहेत. २०२० सालाच्या सुरुवातीला सगळे देश कोरोना संक्रमणापासून आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी हरेक प्रयत्न करत असताना मोदींनी ‘नमस्ते ट्रम्प’ नावाचा कार्यक्रम घेऊन कोरोनाला इथे आवताण दिले. त्यामुळे भारतात कोरोनाचा प्रसार होऊन पुढे लॉकडाऊन आणि कोरोना संसर्गाच्या लाटेत अनेकांचे प्राण गेले.

२०२१ साली जेव्हा कोविडच्या दुसऱ्या लाटेचे संकट घोंघावू लागले, त्यावेळी देखील पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुचेरीच्या निवडणूक प्रचारात मोदी सरकार व्यस्त होते. लाखोंच्या सभा यावेळी विविध राज्यांमध्ये घेण्यात आल्या. त्याचे दुष्परिणाम म्हणून एप्रिलमध्ये भारतात कोरोनाची दुसरी भीषण लाट दिसून आली. हजारो लोकांनी दुसऱ्या लाटेत आपले प्राण गमावले. केंद्र सरकारने ऑक्सिजनचे वाटप, आरोग्य सुविधांसाठी चांगल्या दर्जाचे व्हेंटिलेटर वेळेवर न पुरविल्यामुळे देखील अनेकांनी आपले प्राण गमावले. अशा अनेक संकटांमधून मोदी सरकारने कोणताच धडा घेतलेला दिसत नाही. राज्यांच्या निवडणुका एनकेन प्रकारे जिंकायच्याच असा चंग बांधलेल्या चुनावजीवी राज्यकर्त्यांच्या दिरंगाईमुळे देशातल्या आणि आता तर परदेशात गेलेल्या भारतीयांनाही आपल्या जीवाला मुकावे लागत असेल, तर ही दुर्दैवी बाब आहे.

Share