पर्यटनासाठी नाविण्यपूर्ण उपक्रमांची आखणी करावी-राज्यापाल

औरंगाबादः  मराठवाड्याचे वनक्षेत्र कमी आहे. हे वनक्षेत्र वाढविण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. ‘इको-बटालियन’च्या सहभागातून झालेली वृक्ष लागवड आणि वृक्षांची केलेली जोपासना नक्कीच कौतुकास्पद असून  वनक्षेत्र वाढविण्यामध्ये ‘इको बटालियन’ चा सहभाग महत्वपूर्ण आहे. असे अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून मराठवाड्याचा सर्वांगीण विकास साध्य करावा असे  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले.

औरंगाबाद जिल्ह्यात सुरू असलेल्या अनेक प्रकल्पांचा आढावा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काल सुभेदारी विश्रामगृह येथे घेतला. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, महावितरणचे सह संचालक डॉ. मंगेश गोंदावले, डॉ. विजयकुमार फड, जिल्हा सैनिक अधिकारी सय्यदा फिरासत आदी उपस्थित होते. यावेळी इको बटालियनच्या सहकार्याने केलेली वृक्षलागवड, मानव विकास कार्यक्रम, मराठवाडा विकास मंडळ, रेड क्रॉस सोसायटीने केलेले सामाजिक कार्य, जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत घेण्यात आलेले उपक्रम आदींचे सादरीकरण राज्यपाल यांच्यासमोर करण्यात आले.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  म्हणाले की, इको बटालियन मार्फत करण्यात येत असलेले अनेक प्रयोग कौतुकास्पद आहेत. बांबू हाऊस हे देखील पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. जिल्ह्यात सीएसआरच्या माध्यमातून निधी उभारुन करण्यात येत असलेले प्रकल्प नक्कीच इतरांसाठी अनुकरणीय ठरणार आहेत. मानव विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील सर्वच मुलींना 12 वी पर्यंतचे शिक्षण घेणे शक्य व्हावे याकरिता गाव ते शाळा दरम्यान वाहतूकीची सुविधा उपलब्ध करुन दिल्याने मुलींच्या शिक्षणासाठी याचा लाभ होणार आहे. मानव विकास कार्यक्रमांतर्गत १२५ तालुक्यांमध्ये सुरू करण्यात आलेल्या ३१२५ अभ्यासिका कोविडमुळे बंद आहेत. सध्या कोविडचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अभ्यासिका सुरू करण्याबाबत  विचार करावा. जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत माजी सैनिकांच्या विधवेस स्वयंरोजगाराकरिता देण्यात आलेली आर्थिक मदत, नागरिक मित्र पथक, औरंगाबाद स्मार्ट सीटी बस मध्ये सेवा, एमआयडीसी मध्ये माजी सैनिकांचा वाढता सहभाग हे उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहेत. सैनिकी मुले व मुलींच्या वसतीगृहाचे नुतनीकरण, कारगिल स्मृतीवनाचे सुशोभीकरण, बिडकीन/पैठण एमआयडीसीत कोल्ड स्टोरेजबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे देखील निर्देश यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिले. यावेळी मानव विकास मिशनची माहिती प्रभारी उपायुक्त विनोद कुलकर्णी, मराठवाडा विकास मंडळाची माहिती सह संचालक मच्छिंद्र भांगे, जिल्हा सैनिक कार्यालयाची माहिती जिल्हा सैनिक अधिकारी सय्यदा फिरासत यांनी सादरीकरणाव्दारे दिली.

Share