“छत्रपतींना व्यथित होताना पाहणं वेदनादायक, महाराजांचं नाव वापरण्याची शिवसेनेची लायकी नाही”- मनसे 

मुंबई : छत्रपती संभाजी राजे यांनी राज्यसभेची निवडणूक लढणार नसल्याची मोठी घोषणा केली आहे. आज मुंबई येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती, त्यांनी मला दिलेला शब्द मोडला असल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

संभाजीराजेंच्या या विधानावर आता मनसेचे नेते गजानन काळे यांनी ट्वीट करत शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. “छत्रपतींच्या वंशजाला दुःखी आणि व्यथित होऊन बोलताना पाहणं वेदनादायक होतं. उठता बसता महाराजांचे नाव घेणाऱ्या मात्र वागण्यात खोटारडापणा करणाऱ्यांना आता पक्षाच्या नावात “शिव” वापरायची लायकी नाही असेच म्हणावे लागेल. आदरणीय बाळासाहेब जिथून कुठून पाहत असतील त्यांनाही अश्रू आवरले नसावेत”, असं गजानन काळे म्हणाले आहेत.

राज्यसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवणार असल्याचा निर्णय संभाजीराजे छत्रपतींनी जाहीर केला होता. मात्र, शिवसेनेच्या भूमिकेनंतर संभाजीराजे छत्रपतींनी ही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. “ज्या आमदारांनी ड्राफ्टवर सह्या केल्या, त्या आमदाराचे मनापासून आभार व्यक्त करतो. आयुष्यभर मी त्यांच्या पाठिशी राहणार आहे. त्यांनी केव्हाही हाक द्यावी. शिवसेनेनं मला ऑफर दिली होती. पक्षात प्रवेश करा आणि खासदार व्हा. पण मी सांगितलं होतं की मी जाणार नाही. कालपासून अनेक आमदारांचे फोन आहेत की कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवायचीच. पण मला कल्पना आहे की यात नक्कीच घोडेबाजार होणार. घोडेबाजारासाठी माझी उमेदवारी नाही. सगळ्या पक्षातल्या लोकांनी मला मदत करावी अशी अपेक्षा होती. पण ते होताना दिसत नाही. घोडेबाजार होऊ नये म्हणून मी ही निवडणूक लढणार नाही. पण ही माघार नाही. हा माझा स्वाभिमान आहे”, असं संभाजीराजे छत्रपती पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

Share