मुंबईः आपल्या देशावर जेव्हा आक्रमण होते तेव्हा अनेकांना आपण भारतीय म्हणून एकत्र यावे, ही बाबच उमगत नाही. कारण आपला देश हा जातीपातींमध्ये विभागला गेला आहे. महाराष्ट्रातही हीच गत आहे. महाराष्ट्र हा जातीपातींमध्ये विभागलेला राहील, ही गोष्ट काही लोकांना हवी आहे. काही लोकांना कशाला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना ही गोष्ट हवी आहे. लोक जातीपातींमध्ये विभागले जावेत, हीच शरद पवार यांची इच्छा आहे, अशी घणाघाती टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली. ते शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलत होते.
राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष जातीपातीचे राजकारण करत असल्याचे सांगत शरद पवार यांना धारेवर धरले. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म झाला. त्यापूर्वी महाराष्ट्रात जात हा विषय केवळ अभिमानापुरता मर्यादित होता. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात दुसऱ्या जातींबद्दल द्वेष निर्माण झाला. मराठा आरक्षण आणि अन्य मुद्द्यांवरून आमिषं दाखवून समाजात फूट पाडण्यात आली. अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. यावर आता राष्ट्रवादीचे अनेक नेते बोलले आहेत. काल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना म्हणाले की, शरद पवार यांच नाव घेतल्याशिवाय हेडलाईन बनणार नाही, म्हणून लोक आपल्या भाषणांमध्ये हमखास त्यांचे नाव घेतात अशी टीका आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर केली.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, शरद पवार मुळे जातीपातीचे राजकारण वाढले असे म्हटले जात आहे. मी स्वत: सुद्धा मागासवर्गीय समाजातून आलोय. आज मला शरद पवार यांच्या सोबत काम करून ३५ वर्षे झाली. राजकीय पार्श्वभूमी नसून सुद्धा मी आज या राज्याचा गृहनिर्माण मंत्री आहे. छगन भुजबळ, सुनिल तटकरे आणि धनंजय मुंडे आम्ही सारे मागासवर्गीय समाजातून येतो. मंडल आयोग आणताना या समाजातल्या शोषित-वंचित वर्गाला मुख्य प्रवाहात आणायचे, हाच शरद पवार यांचा विचार होता. शरद पवारमुळेच महिलांना ५० टक्के आरक्षण मिळालं. त्यामुळे पवारांचे नाव घेतल्याशिवाय बातम्यांमध्ये हेडलाईन होत नाही म्हणून लोक हमखास आपल्या भाषणांमध्ये शरद पवारांचे नाव घेतात, अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर टीका केली. तसेच आव्हाड यांनी कळकळीचे आवाहान केले की, महाराष्ट्र पेटेल असे काही वक्तव्य कोणीही करू नये. महाराष्ट्रात सध्या सगळे समाज एकत्र वावरताना, एकत्र काम करताना दिसत आहेत. दोन वर्षांच्या कोरोना प्रादुर्भावानंतर लोक पुन्हा कामाला लागले आहेत. एकतर लोकांच्या खिशामध्ये पैसे नाहीत. गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल, भाज्या, केरोसिन व दैनंदिन वापराच्या वस्तूंचे दर महागले आहेत. मात्र यावर कुणीच बोलताना का दिसत नाही, असा सवालही आव्हाड यांनी केला.