जेल की बेल? संजय राऊतांच्या जामीनावर आज सुनावणी

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांची ईडी कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यामुळे त्यांना आज जामीन मिळणार की तुरुंगातच राहावे लागणार हे पाहावे लागणार आहे.

मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळाप्रकरणी गैरव्यवहाराप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात शुक्रवारी ईडीने आरोपपत्र दाखल केलं होतं. याप्रकरणीही आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. खासदार संजय राऊत सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत.

काही दिवसांपूर्वी संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत १९सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर लगेच राऊत यांनी जामिनीसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. मात्र त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही.पत्राचाळ हा म्हाडाचा भूखंड आहे. मात्र प्रवीण राऊत यांनी म्हाडा व भाडेकरुंची दिशाभूल करुन यातील अनेक भाग हा खासगी कंत्राटदारांना दिला. तसेच त्यातील २५ टक्के शेअर्स हे एचडीआयएलला विकले.

काय आहे पत्राचाळ घोटाळा?
मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे तीन हजार फ्लॅट बांधकाम करायचं होतं, त्यापैकी ६७२ फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु, २०१० मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे २५८ टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर २०११, २०१२ आणि २०१३ मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले. पत्राचाळ जमीन घोटाळा हा १,०३४ कोटी रुपयांचा असल्याचा संशय ईडीला आहे.

Share