औरंगबादेत करुणा मुंडे यांना कार्यक्रम घेण्यास मनाई

औरंगाबाद-  करूणा धनंजय मुंडे यांनी नवीन पक्ष स्थापन करून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला आहे . त्या सध्या राज्यात विविध ठिकाणी दौरा करत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी परळी मधून धनंजय मुंडे यांच्या विरुध्द लढण्याची तयारी दर्शवली आहे. नुकताच त्यांनी पुणे दौरा करून औरंगाबाद जिल्ह्यातील चित्तेपिंपळगाव येथे बैठक घेणार होत्या परंतू या बैठकीसाठीची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील चित्तेपिंपळगावात करुणा मुंडे यांचा कार्यक्रम नियोजित होता. त्यांनी नव्यानं काढलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. संबंधित बैठक घेतली जाऊ नये, अन्यथा कारवाईच्या परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

चित्तेपिंपळगाव येथे कार्यक्रम-

करुणा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या नव्या पक्षाची घोषणा केली. शिवशक्ती सेना असं या पक्षाचं नाव असून लवकरच मोठा मेळावा घेणार असल्याचंही त्यांनी घोषणेत म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर पक्षाचं संघटन उभं करण्याचं काम त्यांनी हाती घेतलं असून चित्तेपिंपळगावात यासंबंधी कार्यकर्त्यांची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, औरंगाबाद पोलीस या कार्यक्रमाला परवानगी नाकारली असली तरीही करुणा मुंडे औरंगाबाद दौऱ्यावर येणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली आहे.

Share