श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दल सातत्याने दहशतवाद्यांच्या कारवाया हाणून पाडण्यासाठी शर्थीने प्रयत्न करीत आहे. त्यात दहशतवाद्यांचा खात्मा करीत आहे. दरम्यान, श्रीनगरस्थित भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने शुक्रवारी त्यांच्या ट्विटर हँडलवर ‘काश्मीर फाईट्स बॅक’ या शीर्षकासह एक भावनिक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला ‘झेलम रोया फॉर काश्मीर’ हे गाणे लावण्यात आले असून, सुरक्षा दलाचे जवान नागरिक आणि लहान मुलांना दिलासा देताना दाखवण्यात आले आहे. या लढाईत काश्मीर एकटाच नसून, आम्ही मिळून ही लढाई जिंकू, असा संदेश देण्यात आला आहे.
हा व्हिडीओ १ मिनिट १८ सेकंदाचा आहे. या व्हिडीओमध्ये काश्मीरमधील नागरिक कोणत्याही धर्माचा असो, त्यांच्यावर दहशतवादाचा कसा परिणाम झाला आहे, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच नागरिकांच्या व्यथा यात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचवेळी काश्मीर खोऱ्यातील स्थैर्यासाठी त्यांच्या लढ्यात लष्कर त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही या व्हिडीओमध्ये देण्यात आली आहे.
व्हिडीओच्या सुरुवातीला अंत्ययात्रा आणि एक रडणारे मूल दाखवण्यात आले आहे. व्हिडीओमध्ये काश्मिरी पंडितांच्या पलायनाची दृश्ये आणि दगडफेकीच्या घटनादेखील दाखवण्यात आल्या असून, दहशतवाद्यांनी खोऱ्यातील तरुणांची कशी दिशाभूल केली आहे हेही यामध्ये सांगण्यात आले आहे. या व्हिडीओमध्ये पत्रकार शुजात बुखारी, सामाजिक कार्यकर्ते अर्जुमंद मजीद, माखन लाल बिंदू, सुपिंदर कौर, अजय पंडिता, लेफ्टनंट उमर फयाज, अयुब पंडिता आणि परवेझ अहमद दार यांच्यासह दहशतवाद्यांनी ठार मारलेल्या काश्मिरी नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. तसेच दहशतवाद्यांनी गप्प बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काश्मीर बोलत राहिला, असा संदेश देण्यात आला आहे.